अहमदनगर - भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज सोमवारी अण्णा हजारे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच अण्णांचे उपोषण सोडवण्यात अपयश आले, तर मंत्र्यांच्या गाड्या फोडू, असा इशाराही देसाई यांनी सरकारला दिला. यावेळी त्यांच्यासोबत अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
आज अण्णांच्या आंदोलनाचा ६ वा दिवस असतानाही सरकार अण्णांच्या मागण्यांप्रती गंभीर नसल्याबाबत तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी आता चर्चेत वेळ न दवडता निर्णय घेऊनच राळेगणसिद्धीत यावे, असे सांगत देसाई यांनी पंतप्रधानांना अण्णांच्या आंदोलनाची दखल घ्यायला वेळ नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
'९ फेब्रुवारीनंतर रणरागिनी मंत्र्यांच्या गाड्या फोडणार'
अण्णांचे वय पाहता सरकारने गंभीरतेसह त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात. अण्णा जरी अहिंसावादी आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असले, तरी हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. त्यामुळे सरकारने ९ फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न केल्यास आणि त्यामुळे अण्णांचे आंदोलन सुरू राहिल्यास भूमाता ब्रिगेडच्या रणरागिणी रस्त्यावर उतरून मंत्र्यांच्या गाड्या फोडतील, असा इशारा तृप्ती देसाई यांनी 'ईनाडू इंडिया'शी बोलताना दिला.