संगमनेर (अहमदनगर) - तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली येथील नवीन घाटात मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. त्यामुळे काही वेळ महामार्ग बंद होता. तर, सर्व वाहतूक ही जुन्या एकेरी घाटाने वळवण्यात आली होती.
मालवाहू ट्रक क्रमांक जीजे ०३ बी. डब्लू. ५५०५ वरील चालक विनोद गिरी गोस्वामी हे राजकोट येथून नामांकित कंपनीच्या वाहनांचे सुटे भाग घेऊन नाशिक येथून संगमनेरमार्गे पुणेच्या दिशेने जात होते. रविवारी दुपारी हा मालवाहू ट्रक पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली नवीन घाटात आला असता, चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक महामार्गावर पलटी झाला. याबाबतची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे ट्रकमध्ये असलेली वाहनांच्या सुट्या भागांची खोकी महामार्गावर पडली होती.
काही वेळ महामार्ग बंद
घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, अरविंद गिरी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक ही जुन्या एकेरी घाटाने वळवण्यात आली. दरम्यान, टोलनाक्याचे कर्मचारीही क्रेन घेऊन घटनास्थळी आले. काही वेळ महामार्ग बंद होता.