अहमदनगर- कोरोनाने शहरातील दोन मोठ्या नेत्यांना कुटुंब आणि जनमानसातुन हिरावून नेले. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला शिवसेनेचे उपनेते माजीमंत्री आणि नगर शहारातून तब्बल पाच वेळेस आमदार राहिलेले अनिल राठोड यांचा कोरोना संसर्गात उपचार सूरू असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. त्यानंतर आज (बुधवार) पहाटे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचाही कोरोना संसर्गात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राठोड-गांधी या दोन नेत्यांनी गेले तीन दशके नगर शहरावर आपापल्या मतदारसंघात एकहाती वर्चस्व गाजवले. मात्र या दोन्ही नेत्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. यामुळे राजकीय पोकळी निर्माण झाल्याचे सेना-भाजपात आणि सर्वसामान्य जनतेतून प्रतिक्रिया आहे.
अनिल राठोड यांच्या जाण्याने शिवसेना पोरकी-
कट्टर शिवसैनिक आणि जनसामान्यांच्या हाकेला चोवीस तास उपलब्ध असलेला नेता म्हणून अनिल राठोड यांनी नगरच्या राजकारणात एक वेगळी मोहर उमटवली. भैय्या नावाने त्यांना कुणीही हाक मारावी आणि भैय्यांनी, बोल भैय्या काय काम आहे, असे विचारावे, अशी आपुलकीची प्रतिमा राठोड यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली. काँग्रेस, डावेपक्ष यांना शह देत साखरपट्यातील नगर जिल्ह्यात शहरासह जिल्ह्यात शिवसेनेला खेड्यापाड्यात पोहचवण्याचे काम राठोडांनी केले.
1987 साली शिवसेनेत प्रवेश करताच ते नगर शहर प्रमुख झाले. पुढे जिल्हाप्रमुख झाले. 1990 ते 2014 पर्यंत ते तब्बल पंचवीस वर्षे शिवसेनेचे आमदार राहिले. युती शासनात 1995 ते 97 हे दोन वर्षे त्यांनी अन्न पुरवठा राज्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले. 2014 साली राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांनी त्यांचा पहिल्यांदा पराभव केला. मोदी लाटेत भाजप उमेदवाराने अनपेक्षित घेतलेली जास्तीची मते ही अनिल राठोड यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. पराभूत झाल्यानंतरही त्यांनी शहरात शिवसेना हा महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा पक्ष ठेवला. 2003 साली नगरच्या पालिकेची महापालिका झाल्यानंतर शहरात पहिला महापौर शिवसेनेचा झाला तो राठोड यांच्या मुळेच. 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांनी पुन्हा पराभव केला. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आले. मात्र राठोड आणि जगताप यांचे सूत्र कधीच जुळले नाही. मात्र नगर शहरात सर्व स्तरातील एक मोठा चाहता वर्ग राठोड यांच्या सोबत अखेरपर्यंत राहिला. दुर्दैवाने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ते कोरोना बाधित झाले. त्यात प्रकृती ढासळली असताना त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.
राठोड यांच्या जाण्याने शिवसेनेचे वैभव लोपले-
अनिल राठोड यांच्या कार्यकाळात तब्बल तीस वर्षे शिवसेनेने शहरात राज्य केले. पालिका, महापालिकेत त्यांनी वर्चस्व ठेवत सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेकडून निवडूण आणले. मात्र फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना नेहमी धक्का बसला. अनेक जुने सहकारी फुटले. मात्र राठोड यांनी आपल्या एकट्याच्या भैय्या नावाच्या वलयावर शिवसेनेला अग्रेसर ठेवले. सध्याच्या महापालिकेतही शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. मात्र राष्ट्रवादी पक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही. असे असले तरी शहरावर महापालिकेसह विधानसभेसाठीही भगवा फडकवू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जागृत ठेवला. दुर्दैवाने गेल्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर मात्र शिवसेनेतील गटबाजी अनेक ठिकाणी दिसून आली. भाजप-राष्ट्रवादीची अनोखी साठगाठ ही केवळ शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी आणि आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी या दोन्ही पक्षांनी अंगिकारली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला शहरावर एकहाती वर्चस्व असलेले नेतृत्व उरले नसल्याचे बोलले जात आहेत. केवळ विशिष्ठ भाग किंवा प्रभागापुरते नेतृत्व असल्याने राठोड यांच्या निधनाने शिवसेनेत मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.
माजी खासदार गांधीच्या निधनाने भाजप मधेही पोकळी-
नगर दक्षिणचे तीनदा खासदार राहिलेले माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचेही कोरोनामुळे निधन झाले. राठोडांप्रमाणेच गांधी यांनीही पक्षात एकहाती वर्चस्व ठेवले. संघ विचारात वाढलेले दिलीप गांधी एका सामान्य कुटुंबातून येत पुढे केंद्रातील मंत्रिपदापर्यंत पोहचले. एक साधी चहाची गाडी, पुढे पावभाजीची गाडी असा व्यवसाय करणारे गांधी भाजपात सुरुवातीपासून सक्रिय होते. यातूनच भाजपचे युवा शाखेचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पुढे नगरसेवक, उपनगराध्यक्ष झाले. 1999 ला पक्षाने त्यांना नगर दक्षिणेतून उमेदवारी दिली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार दादा पाटील शेळके यांचा पराभव करत विजयश्री मिळवली. पुढे 2004 ला पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारत प्रा.ना.स.फरांदे यांना उमेदवारी दिली. मात्र फरांदे सर पराभूत झाले. पक्षाने 2009 आणि2014 ला गांधी यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि ते दोन्ही वेळेला विजयी झाले.
मात्र पुन्हा 2019 ला पक्षाने त्यांची उमेदवारी पक्षात ऐनवेळी आलेल्या सुजय विखे यांना दिली. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने काहीसे नाराज असले तरी गांधी यांनी पक्ष न सोडता सुजय विखे यांचे काम केले. एकंदरीत पंचवीस-तीस वर्षे पक्षात कार्यरत राहिल्याने गांधी यांचे पक्षात मोठे वजन होते. ग्रामीण भागात भाजप कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांनी तयार केले होते. आपल्या आपुलकीने वागण्याने त्यांना मानणारा सामान्य वर्गही मोठा होता. त्यामुळेच कर्जत, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा आदी ठिकाणी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना अनेकदा फायदा झाला. मात्र गांधी यांच्या आज झालेल्या निधनाने भाजपात राजकीय पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक नेत्यांनी बोलून दाखवली आहे.
हेही वाचा- लस ही कवच-कुंडल.. मात्र लस घेतल्यानंतरही होऊ शकतो कोरोना - राजेश टोपे