शिर्डी - संगमनेर तालुक्यातील पुणे - नाशिक महामार्गावर कऱ्हे घाटाजवळ ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री झाला आहे. या अपघातात गणेश सुखदेव दराडे, श्रीकांत बबन आव्हाड, अजय श्रीधर केदार या तीन तरुणांची नावे आहेत.
हेही वाचा - ठाण्यात देवीच्या विसर्जनासाठी गेलेले 4 तरुण काळू नदीत बुडाले
नांदुर-शिंगोटेवरून कऱ्हे गावाकडे येत असताना ही कार पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील तीन युवकांचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, पोलीस कॉन्स्टेबल रफिक पठाण, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधील तीन युवकांना बाहेर काढले. या अपघातामुळे पुणे - नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.