अहमदनगर - शिर्डीतील आदर्श विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेले ३ विद्यार्थी घरून शाळेत येत असताना बेपत्ता झाली आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदर्श विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेले हे ३ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी निघाले. मात्र, शाळेत न पोहचता अचानकपणे गायब झाले आहेत. सकाळी शाळेच्या वेळेच्या आधीच १० वाजता शाळेचे दप्तर आणि गणवेश घालून हे तिघे आप आपल्या घरातून निघाले. पालकांनी लवकर जाण्याचे कारण देखील विचारले. मात्र, अतिरिक्त वर्ग असल्याचे सांगत ही मुले शाळेकडे गेली. मात्र, शाळेत पोहचली नसल्याने पालकांची जीव टांगणीला लागला आहे.
साई भारत बाविस्कर (वय १३ वर्ष), संकेत राजेंद्र वीर (वय १३ वर्ष) आणि सोनू नवनाथ कुलथे (वय १५ वर्ष) अशी या मुलांची नावे असून अंगात पांढऱया रंगाचा शर्ट आणि केशरी रंगाची पँट असा शालेय गणेवश परिधान केला आहे. या मुलांचा पालकांनी सर्वत्र शोध घेतला असून नातेवाईक आणि मित्रांकडेदेखील काहीच माहीती मिळून येत नसल्याचे पालकांनी सांगीतले आहे.
ही तिन्ही मुले गुरुवारी १४ मार्च रोजी बेपत्ता झाली असून तिघांबद्दल कोठेही माहीती मिळून न आल्याने अखेरीस पालकांनी शिर्डी पोलिसांमध्ये धाव घेत तक्रार दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मुले अल्पवयीन असल्याने भादवी ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी दाखल करत संबधीत मुलांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली असून संबधीत मुलाांबद्दल काहीही माहीती मिळाल्यास शिर्डी पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.