शिर्डी - राज्यात कोवीड 19 ची संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधीत होण्याची शक्यता लक्षात घेवून करावयाच्या उपाययोजनांसाठी साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात श्रीरामपुर येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ.कृष्णकुमार चोथाणी यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, शिर्डी ग्रामस्थ विजय कोते, श्री साईबाबा हॉस्पिटलचे प्र.वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, श्री साईनाथ रुग्णालयाच्या बालरोग तज्ञ डॉ.उज्वला शिरसाठ, डॉ.अनंत भांगे, श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु असून मोठया प्रमाणात संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होणार असल्याचे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील आरोग्य व्यवस्था वाढवून बालरोग तज्ञांची कमिटी स्थापन केली आहे. तसेच संस्थानाच्या वतीने यापूर्वी कोरोना पादुर्भाव रोखण्यासाठी व उपचारांसाठी विविध उपाय योजना केल्या आहे. तिसऱ्या लाटेची बाब लक्षात घेवून करायच्या उपाययोजनांकरीता हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रात बालरोग तज्ञ डॉ.कृष्णकुमार चोथाणी म्हणाले की, सध्या देशात व राज्यात दुसरी लाट सुरु असून लवकरच यात लहान मुलांना अधिक धोका आहे. ही बाब गंभीरपणे हाताळणे गरजेचे आहे. असे सांगून विशेष काळजी घेणे व योग्य औषधे आणि त्याचे प्रमाण याबाबत डॉ.चोथाणी यांनी मार्गदर्शन केले.