अहमदनगर - अकोले शहरातील हाॅटेल जय महाराष्ट्रच्या पाठीमागे असलेले मातोश्री कॉम्प्लेक्समधील स्टार मोबाईल शाॅपीचे शटर उचकटून तीन चोरट्यांनी महागड्या कंपन्यांचे तीन ते चार लाख रुपयांचे मोबाईल चोरून पोबारा केला आहे. विशेष म्हणजे, या चोरट्यांनी पीपीई किट सारखा पोषाख परिधान करत मोठा डल्ला मारला आहे.
पीपीई किटसारखा पोषाख केलेले चोर
अकोले शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कोल्हार-घोटी राज्यमार्गालगत असलेल्या हॉटेल जय महाराष्ट्रच्या पाठीमागे असलेले समीर सय्यद यांच्या स्टार मोबाईल हे दुकानात बुधवारी मध्यरात्री 2 वाजून 27 मिनिटांच्या दरम्यान चोरी झाली. चोरीचा सर्व प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. त्यांनी तीन ते चार लाख रुपयांचे मोबाईल गोणीत भरून नेले आहेत. तसेच, दुकानातील वस्तूंचीही तोडफोड केली आहे. यामध्ये तीन चोर असल्याचे दिसत असून त्यांनी चक्क पीपीई किटसारखा पोषाख केला आहे.
हेही वाचा - 'ड्रेस कोडने अधिकाऱ्यांचा उर्मटपणा कमी होईल का? कामाचा वेग वाढवण्यासाठी लक्ष द्यावे'
सकाळी घटना आली उघडकीस
सदर घटना ही सकाळी या मातोश्री कॉम्पलेक्सचे मालक दत्ता धुमाळ हे घराबाहेर आले असता त्यांना दुकानाचे शटरचे लॅाक तुटलेले निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ दुकान मालक समीर सय्यद यांना फोनवर माहिती दिली. त्यानंतर समीर सय्यद यांनी प्रत्यक्ष पाहून अकोले पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अकोले पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
तालुक्यातील गुन्हेगारीचे आव्हान
अकोले पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी अकोलेचा पदभार घेताच त्यांना या चोरीच्या घटनेसह तालुक्यातील गुन्हेगारीने आव्हान दिले आहे. चोरीची घटना कैद झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व प्रकार दिसत आहे. मात्र, चोरी करताना कोविड काळात वापरल्या जाणाऱ्या पीपीई किटसारखा पोषाख परिधान करत चोरट्यांनी आपली ओळख लपवत पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.
हेही वाचा - अनैतिक संबंधातून तृतीयपंथीयाचा खून; चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल