अहमदनगर- राहाता शहराचे ग्रामदैवत असलेल्या विरभद्र महाराज मंदिरात आज पहाटे ३ च्या सुमारास चांदीच्या मुकुटासह अनेक आभुषणे चोरीला गेली आहेत. चोरलेल्या ऐवजाची किंमत सुमारे चार लाख रुपये असल्याचे समजले आहे. ही घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दोन चोरट्यांनी ही चोरी केली असून चोरलेल्या वस्तूंमध्ये विरभद्र महाराजांचा चांदीचा मुकूट, शंकर, पार्वतीच्या डोक्यावरील मुकूट आणि मंदिरातील इतर दागिन्यांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वच लहान मोठी मंदिरे बंद करण्यात आली आहेत. याचाच फायदा घेत चोरट्यांनी मंदिरात हात साफ केला. मंदिरातील पुजारी केवळ दैनंदिन पूजा करतात. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या भिंतीवरून आत शिरत मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. विरभद्र मंदिराच्या गाभाऱ्यात घुसून चोरट्यांनी चांदीचा मुकूट चोरला. तर, मंदिरातील शंकर पार्वतीच्या मूर्तीवरील मुकूटही चोरट्यांनी लांबवला.
चोरी झाल्याची बाब सकाळी लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून तपास सुरू केला आहे. श्वानपथकाने मंदिरापासून मागच्या बाजूने २ किलोमीटरपर्यत चोरट्यांचा माग काढला. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
विरभद्र महाराज हे राहाता शहराचे ग्रामदैवत आहेत. त्यामुळे, मंदिरात चोरी झाल्याचे कळताच ग्रामस्थांची मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या चोरीमुळे गावकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी विरभद्र देवस्थानचे अध्यक्ष सागर सदाफळ, तसेच गावकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा- छत्रपतींच्या काळात एक इंजिनिअर म्हणून बरेच काही शिकता आले असते - जयंत पाटील