अहमदनगर - शिर्डीतील रामनवमी उत्सवास आजपासुन सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षीही भक्तांविना हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. भक्तांना उत्सवात सामील होता येणार नसले तरी धार्मिक कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. हा उत्सव तीन दिवस चालणार आहे.
रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी साईबाबांच्या फोटोची व साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी विणा, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी पोथी व प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले व वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे यांनी श्रींची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, वैशाली ठाकरे व मंदिर पुजारी उपस्थित होते. रामवनमी उत्सवाच्या प्रथम दिवशी संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी सपत्नीक समाधी मंदिरात पाद्यपूजा केली. रामवनमी उत्सवाच्या प्रथम दिवशी साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. यामध्ये वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी पहिला, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल पोरवाल यांनी दुसरा अध्याय, बांधकाम विभागाचे उपअभियंता दिनकर देसाई यांनी तृतीय, वैद्यकीय अधिकारी डॉ.मदेवराम तांबे यांनी चौथा व वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका गाडेकर यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले.
रामनवमी उत्सवाचा प्रारंभ
शिर्डीतील रामनवमी उत्सव हा शके १८३३ म्हणजेच १९११साली साईभक्त भिष्म यांनी रामनवमी उत्सव साजरा करण्याची साईबाबांना विनंती केली. तेव्हापासून साईबाबांच्या आज्ञेनेच भिष्म आणि गोपाळराव गुंड या भाविकांनी रामनवमी उत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. तेव्हा पासून आजपर्यंत ही पंरपरा आणि हा उत्सव सुरु आहे. रामनवमीला शिर्डी गावात यात्राही असते. यात्रा निम्मीताने बाहेरगावी गेलेले अनेक शिर्डीकर गावी येतात. तर रामनवमी उत्सवासाठी खास मुंबई हुन पायी चालत पालख्या घेवुन भाविक शिर्डीला येत असतात.
कोरोनामुळे भक्तांचा हिरमोड
मागच्या वर्षी आणि या वर्षीही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहे. शिर्डी साईमंदीरही भक्तांना दर्शनासाठी बंद आहे. राज्यात संचारबंदी लागु करण्यात आल्याने अनेक भक्तांना शिर्डीत दर्शन घेण्यासाठी येण्याची इच्छा असूनही येता येत नाही. मात्र श्रद्धेच्या बरोबरीनेच सबुरीही महत्त्वाची असल्याने तुम्ही घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.