अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गतवर्षी कृषी विषयक मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यस्तीने स्थगित करण्यात आले. मात्र हे आंदोलन स्थगित करताना अण्णांना दिलेले आश्वासन केंद्र सरकारने दोन वर्षांनंतरही पूर्ण केले नाही. त्यामुळे अण्णांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी मंगळवारी (15 डिसेंबर) रोजी विद्यमान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना खरमरीत पत्र पाठवून मागण्या पूर्ण न केल्याने पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
- केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता द्या
- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणा
- शेतमालाला सी-2 प्लस फिफ्टी या प्रमाणे भाव द्यावा
- हमीभावात धानासोबतच फळे, भाजीपाला, दूधाला हमीभाव मिळावा
अण्णांचे दिल्ली आंदोलनासाठी एक दिवसीय उपोषण
अण्णा हजारे यांनी दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धीमध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर एक दिवसीय उपोषण आंदोलन करून पाठिंबा दिला.
आण्णांच्या भूमिकेबाबत चर्चांना उधाण!
समाजसेवक अण्णा हजारेंनी आपल्या जीवनात अनेक मुद्यांवर सरकार विरोधात आंदोलनं केली आहेत. सरकार कोणाचेही असो अण्णांनी त्या-त्या काळात आंदोलने केली आहेत. मात्र अण्णा आता आंदोलने का करत नाहीत, याबद्दल समाजमाध्यमात प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे. आंदोलने, उपोषणे फक्त अण्णांनीच करावीत का, असा प्रश्नही अण्णा समर्थक उपस्थित करतात आणि ते योग्यही आहे.
मात्र सध्या अण्णांबद्दल हाच प्रश्न उपस्थित होण्याचे कारण, म्हणजे एकीकडे दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन चारणसीमेवर असताना अण्णांनी फेब्रुवारी 2019 मधील स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्याचे कारण काय, याबद्दल समाजमाध्यमांत चर्चा क्रमप्राप्त झाली आहे. अण्णांनी दिल्ली आंदोलनासाठी एक दिवसीय उपोषण केले. मात्र त्यानंतर त्यांनी आपले स्थगित आंदोलनाचा इशारा याच वेळी द्यावा, यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत अण्णांची भूमिका 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या अण्णा माध्यमांशी बोलणार नसल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
अण्णांनी भ्रष्ट कारभार, भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात नेहमीच आक्रमक आंदोलने केलेली आहेत. अनेक भ्रष्ट अधिकारी त्यांच्या आंदोलनाने निलंबित झाले आहेत. अण्णांच्या पाणलोट कार्यक्रमातील योगदान मोठे आणि आदर्शवत आहे,याबद्दल त्यांचा जागतिक पातळीवर गौरव झाला आहे. अनेकदा सरकारची भूमिका न पटल्याने अण्णांनी पुरस्कार परत करण्याची भूमिका घेतली आहे. एकूणच एकीकडे दिल्लीत कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू असताना अण्णांनी आपल्या मागील वर्षीच्या मागण्यांसाठी स्थगित केलेल्या आंदोलनाची पुन्हा सुरुवात होणार असल्याने सांगितल्यानंतर अनेक विषयांचा उहापोह होऊ शकतो.