अहमदनगर - सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. बाजारात विक्रीसाठी कलिंगड दाखल झाले आहेत. उन्हाळ्यात कलिंगडाला नागरिकांकडून मोठी मागणी असते. बाजारात गेल्यानंतर कलिंगड लाल आहे की नाही, हे पाहून खरेदी केले जाते. कलिंगड आतून जेवढे लाल ते तेवढे गोड मानले जाते. मात्र संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील शेतकऱ्याने त्याच्या शेतात पिवळ्या कलिंगडाची लागवड केली आहे. या कलिंगडाचे बी त्याने खास विदेशातून मागवले आहे. पाहूयात हा विशेष रिपोर्ट.
विदेशात आतून पिवळा रंग असलेल्या कलिंगडाची लागवड करतात, अशी माहिती संगमेनेर तालुक्यातील घारगाव येथील तरुण प्रगतिशील शेतकरी किरण धात्रक यांना इंटरनेटवरून मिळाली होती. आपणही आपल्या शेतात याच प्रकारच्या कलिंगडाची लागवड करायची असे त्यांनी ठरवले. त्यानुसार त्यांनी मग या कलिंगडाचे बियाणे तैवानच्या एका कंपनीकडून ऑनलाईन मागवले. त्यानंतर या आरोही जातीच्या बियाण्याचे त्यांनी रोपे तयार केली, व त्यानंतर त्यांनी एक एकरात या कलिंगडाच्या रोपांची लागवड केली. आता या रोपांना मोठ्या प्रमाणात फळ लागले आहे.
कलिंगडाचे 20 क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन
किरण धात्रक यांनी लावलेल्या या कलिंगडाचा रंग बाहेरून हिरवा आणि आतून पिवळा आहे. या पिवळ्या रंगाच्या कलिंगडाचा आकार लाल कलिंगडाप्रमाणेच आहे. परंतु हे कलिंगड जेव्हा कापले जाते, तेव्हा लालऐवजी हे कलिगंड आतून पिवळ्या रंगाचे असते. यासाठी त्यांना एकरी साठ हजारांचा खर्च आला आहे. हे पीक 75 ते 80 दिवसांत काढणीला आले असून, त्यांना सुमारे 20 क्विंटल पेक्षा जास्त पिवळ्या कलिंगडाचे उत्पादन झाले आहे. सध्या लाल कलिंगडाला बाजारात आठ ते दहा रुपये किलोचा भाव मिळत आहे. तर त्यांच्या या पिवळ्या कलिंगडाला 15 रुपयांच्या वर भाव मिळेत असा विश्वास शेतकरी धात्रक यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान ही कलिंगडे बाजारात येण्यासाठी आणखी 8 दिवसांचा कालावधी आहे. हे कलिंगडाचे पीक पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी व व्यापारी गर्दी करत आहेत.
हेही वाचा - जायकवाडीसह महाराष्ट्रातील 10 धरणे धोकादायक, संयुक्त राष्ट्राचा अहवाल