अहमदनगर - कोरोना विषाणू पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांबरोबर दुबईतून प्रवास करणार्या नगरमधील चार जणांना महापालिका आणि जिल्हा रुग्णालयाने सार्वजनिक ठिकाणी पुढील १४ दिवस फिरण्यास मनाई केली आहे. हे चौघे नगरमध्येच त्यांच्याच घरी बंदिस्त असून, त्यांच्यावर वैद्यकीय पथकाचे बारकाईने लक्ष असल्याचे जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी सांगितले.
मुंबई ते दुबई असा एका पर्यटन कंपनीबरोबर प्रवास करणार्या ४० जणांपैकी पुण्यातील काही जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या प्रवासामध्ये नगरचे चौघे होते. ते नगरला त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. दरम्यान, पुण्यात दाखल झालेल्या रुग्णांच्याबरोबर कोण-कोण होते, याचा तपास वैद्यकीय अधिकार्यांनी केला. त्यात या ४० जणांची नावे पुढे आली. त्यानुसार सर्वांवर वैद्यकीय पथकाने लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये नगरचे चौघे असल्याने त्यांच्यावर देखील वैद्यकीय पथकाने लक्ष केंद्रीत केले आहे.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये अवैध दारू भट्टी पोलिसांनी केली उध्वस्त; अडीच लाखांची गावठी दारू नष्ट
महापालिका आणि जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने या चौघांची काल(मंगळवार) तपासणी केली. या चौघांमध्ये कोरोनाविषयी कोणतीही लक्षणे आढळली नाही. मात्र, त्यांना पुढील १४ दिवस सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या चौघांना त्यांच्या घरात पुढील काही दिवस बंदिस्तपणे थांबवावे लागणार आहे आणि तशा सूचना संबंधित चौघांना दिल्याचे डॉ बापूसाहेब गाडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अफवा आणि त्यातून निर्माण होणार्या घबराटीचे वातावरण याबाबत जागरूक राहण्याचे आवाहनदेखील डॉ. गाडे यांनी केले. महापालिकेने बुथ हॉस्पिटलमध्ये ५० खाटांचे, तर जिल्हा रुग्णालयात १० खाटांचे विलिगीकरण कक्ष उभारला असल्याचेही डॉ. गाडे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - आमदार रोहित पवारांच्या 'जनता सुसंवाद'मध्ये तक्रारींचा पाऊस..