अहमदनगर- मंगळवारी महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा सुरू असताना पालिकेच्या स्टेशनरोडवर असलेल्या शाळेतील विद्यार्थी, पालक सभेत अचानक घुसले. सभेत मोठ्या संख्येने विद्यार्थी घुसल्याने एकच गोंधळ उडाला. अचानक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत विद्यार्थी आणि शिक्षकांनी थेट सभागृहातच आंदोलन केले.
सन २००९ साली राज्य शासनाच्या मान्यतेने पालिकेच्या उत्पन्नातून स्टेशनरोडवरील शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, पुढे शिक्षकांचे पगार या विषयावर मनपा प्रशासनाने पुढील कारवाई न केल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मनपा प्रशासनाने योग्य ते निर्णय वेळच्या वेळी न घेतल्याचा फटका गरीब विद्यार्थ्यांना का? असा सवाल संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी प्रशासनाला यावेळी विचारला. महापालिकेने ८ दिवसापूर्वी ही शाळा बेकायदेशीर असल्याचा दाखला देत बंद केली होती. त्यामुळे शाळा तात्काळ सुरु करा, अशी मागणी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.
माजी महापौर सुरेखा कदम, स्थायी समितीच्या माजी सभापती सुवर्णा जाधव, माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, आदींनी विद्यार्थी आणि शिक्षकांची बाजू घेत शाळा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. या गोंधळात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी ही शाळा तात्काळ सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. येत्या दोन दिवसांत शाळा पूर्ववत सुरू न झाल्यास पालिकेत घुसून सर्व कामकाज बंद पाडू, असा इशारा यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी दिला आहे.
आयुक्तांनी शाळा बंदची कारवाई कोणत्या नियमाखाली केली, याची चौकशीची मागणी बाळासाहेब बोराटे यांनी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान नको म्हणून शाळा तत्काळ सुरू करा, अशी मागणी संपत बारस्कर यांनी लावून धरली. शिक्षकांच्या वेतनासाठी धोरणात्मक तरतूद करण्याची गरज असल्याचे बारस्कर यांनी यावेळी सांगितले. महापौर वाकळे यांनी या सर्व गोष्टींची दखल घेत शाळा तत्काळ सुरू करण्याचा आदेश प्रशासनाला दिला.