शिर्डी- राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई दरबारी जाऊन साईंचे दर्शन घेतले. 'राज्यातील दुष्काळ हटून सर्व धरणे पाण्याने भरु देत', असे साकडे साई चरणी घातले असल्याचे यावेळी विखेंनी सांगितले.
विखे पाटलांनी यावेळी बाळासाहेब थोरातांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, नवीन अध्यक्षांनी पक्षातील लोक कसे पक्षात टिकून राहतील याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी थोरातांना दिला आहे. लोकसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालंय. आता विधामसभेत 230 जागांवर युतीचा विजय होईल अशी परिस्थिती असल्याचे विखेंनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत युतीमध्ये सुरु असणाऱ्या वादावरही विखेंनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री राहतील यात कोणताही संदेह नाही. मात्र युतीत बेबनाव वाढू नये म्हणून अन्य मंडळींनी यावर भाष्य करणे टाळावे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये होणारी संभ्रमावस्था टाळता येईल, असे विखे पाटील म्हणाले.
मी आता नवी भूमिका स्वीकारली आहे. काँग्रेसची अधोगती होणार का प्रगती, याचा विचार त्यांनीच करावा. मात्र जुनेच चेहरे नवीन मेकअप करून समोर आणले जात आहेत, असे म्हणत विखेंनी काँग्रेस पक्षावर टीका केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे यांनी एकत्र केलेल्या विमान प्रवासामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचा एकत्र प्रवास हा केवळ योगायोग होता. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही. दोघेही आपापल्या कामासाठी दिल्लीला जात होते, असे ते म्हणाले.
आमची भूमिका ठरलेली आहे. लोकसभेत आम्ही दोन जागा जिंकल्या होत्या. आता नगरमधील विधानसभेच्या सर्व जागा आम्हीच जिंकू, असा विश्वास विखे पाटलांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.