अहमदनगर - शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित ठिबक अनुदान, अस्तरीकरण अनुदान, कांदा चाळ अनुदान यासह शेवगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेवगाव कृषी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेती अवजारे अनुदान, चापडगाव व बोधेगाव गटातील पीकविमा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे सरसकट करावेत व त्याबदल्यात शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी शेवगाव कृषी कार्यालयाला पत्रव्यवहार करून प्रलंबित अनुदान त्वरित शेतकऱ्यांना देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झाला नाही. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत असताना शासनाकडून अनुदानासाठी टाळाटाळ होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत देखील शेवगाव कृषी विभाग कोणत्याही प्रकारची दाद देत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. प्रशासनातले अधिकारी कोणत्याही प्रकारची दाद देत नसल्यामुळे आज शेवगाव कृषी कार्यालय समोर ठिय्या आंदोलन केल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांनी म्हटले.
सकाळी साडेदहा वाजता हे ठिय्या आंदोलन सुरू झाले. मात्र, तीन वाजल्यानंतरही मार्ग निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, प्रवीण मस्के जिल्हा सर्च सरचिटणीस बाळासाहेब फटांगरे, अमोल देवडे भोसले मेजर नारायण पायघन, दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.