अहमदनगर - राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलच तापू लागले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या भविष्याला अंधारात ठेवण्याचे काम पवार कुटुंबीयांनी केल्याचे विखे यावेळी म्हणाले. त्यामुळे आता विखे-पवार वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
अहमदनगरच्या राहुरीमध्ये भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जमलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खासदार सुजय विखे पाटील बोलते होते. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार हल्ला चढवला.
ईडी प्रकरणावरून शरद पवार आणि अजीत पवार यांचे नाव न घेता, शेतकऱयांचे पैसे घशात घालणाऱयांना सहानुभूती कशासाठी? असा सवाल करत, जनतेचा पैसा खाणारे पुढील दोन वर्षांत जेलमध्ये जातील असे विखे म्हणाले. महाराष्ट्राच्या भविष्याला अंधारात ठेवण्याचे काम पवार कुटुंबीयांनी केले आहे असे म्हणत विखेंनी पवार कुटुंबीयांवर निशाना साधला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार आणि विखे घराण्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखेंना शिवसेनेचा धक्का, तर शिर्डीतून विखेंविरोधात काँग्रेस कोणाला देणार उमेदवारी?
हेही वाचा - अहमदनगरमध्ये भाजपच्या तीन उमेदवारांचा अर्ज दाखल