अहमदनगर - ज्या काटेरी निवडुंगाचा फारसा उपयोग होत नाही, ज्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशा निवडुंगातून अस्तगाव येथील शेतकऱ्याने आर्थिक प्रगतीची वाट शोधली आहे. अण्णासाहेब आंत्रे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी फुलवलेल्या या निवडुंगामुळे त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
अण्णासाहेब आंत्रे यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. शिर्डीजवळील अस्तगावसारख्या छोट्याशा गावात ते राहतात. अस्तगाव शिवारात अण्णांनी आपली नर्सरी फुलवली. या नर्सरीत त्यांनी निवडुंगाची बागच फुलवली. नर्सरीतील झाडे, त्यांचे रंग, फुले, आकर्षित करुन घेत आहेत. एकेकाळी दुसऱ्याच्या नर्सरीत मजूर म्हणून काम करणारे अण्णा आता स्वत:च्या कष्टाने आणि मेहनतीने स्वत: नर्सरीचे मालक झाले आहेत.
अस्तगाव हे नर्सरीचे गाव आहे. येथे अनेक वर्षापासुन नर्सरी उद्योग बहरले. यातील एका नर्सरीत अण्णा कामाला होते. मात्र, किरकोळ कारणावरुन अण्णा आणि मालक दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर अण्णांनी ते काम सोडले. काम सोडल्यावर त्यांच्यापुढे अंधार होता. निवडुंगात मन रमल्याने त्यांचे मन दुसऱ्या कामात लागत नव्हते. निवडुंगाची नर्सरी टाकण्याचे स्वप्न होते. त्यात रहायला स्वत:चे घर नाही, दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत त्यांचे वास्तव्य करत होते. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांनी आपले स्वप्न जिवंत ठेवले. थोडेसे पैसे जमवुन त्यांनी एका पतसंस्थेकडून कर्ज घेतले. त्या कर्जाची गुंतवणुक एका छोट्या नर्सरीत केली. अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी राहत्या झोपडीजवळ बांबुचे शेड उभे करुन त्यावर प्लास्टिकचा कागद टाकून साबराची लागवड केली. शेडवरचा कागद दर महिन्याला फाटायचा. त्यावेळी तो बदलण्याचीही ऐपत नव्हती. अशा अनेक कठीण परिस्थितीत अण्णांचे काम सुरुच होते. याप्रसंगी अण्णांच्या गुजरातमधील एका मित्राने त्यांना मदत केली.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल
अण्णांनी कलम करुन 250 झाडांची निर्मिती केली. कष्टामुळे निवडूंग फुलले. मात्र, पुढे काय? याच दरम्यान अण्णांचा कर्नाटकातील मित्र रंगास्वामी अण्णांना शोधत नर्सरीत आला. अण्णांनी फुलवलेली बाग पाहुन रंगास्वामी खुश झाले आणि 30 हजार रुपयांना निवडुंगाची झाडे खरेदी केली. यानिमित्ताने येथेच अण्णांच्या समर्थ कँक्टस नर्सरीची मुहूर्तमेढ रोवली गेली. यानंतर अण्णांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मदर प्लँट विकसित करण्यासाठी पतसंस्थेचे कर्ज घेत अर्धा एकर जमीन खरेदी केली. याठिकाणी शेडनेट उभारुन मदर प्लँट विकसित केला. साबर तसेच विविध प्रकारची कलमे केली. दोन महिने वाट बघितल्यानंतर पुन्हा अण्णांना नशिबाने साथ दिली. अलिबागचे फिरोजशहा मस्तानी यांनी अण्णांच्या नर्सरीला भेट दिली आणि 70 हजारांची झाडे खरेदी केली.
भारतात आज निवडुंगाच्या 1600 जातींचे जतन करणारे अण्णा देशातील एकमेव व्यक्ती असल्याचे कँक्टस असोशिएशनचे चेअरमन डॉ. राम गांधी यांनी सांगितले आहे. म्हणूनच अण्णांचे निवडुंगातील संशोधन माईल स्टोन ठरले आहे.
हेही वाचा - 'राज्यकर्ते अजून किती निर्भयांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहेत'
अण्णांना देश-विदेशात होणाऱ्या कॅक्टस प्रदर्शनाचे आमंत्रणही मिळाले. मुंबई येथील प्रदर्शनात अण्णांची 200 झाडे विकली गेली. प्रदर्शनात आयोजकांनी त्यांच्या कलेचे कौतुक करत भारतभरातील प्रदर्शनाची वाट मोकळी करुन दिली. यानंतर दिल्ली, हैदराबाद, सुरत येथील प्रदर्शनात अण्णांच्या रोपाची जोरदार विक्री झाली. याच आवडीतुन आएएस अधिकारी ए.के. सिंग अण्णांचे काम पाहून भारावले. त्यांनीही अस्तगावातील नर्सरीला भेट दिली आणि थायलंड, जपान येथून आणलेले निवडुंगाचे मदर प्लँट अण्णांना भेट दिले. यी नविन मार्गदर्शनातुन अण्णाच्या संशोधनाला नविन दृष्टी मिळाली. आजपर्यंत अण्णांनी 1600 निवडुंगाच्या जातीवर कलम केले आहे. देशातूनच नव्हे आता विदेशातूनही अण्णांकडे ग्राहक येऊ लागले आहेत. याच बळावर अण्णांनी कर्ज फेडत बंगला, गाडी घेत अशी आर्थिक प्रगती साधली आहे. परिस्थिती कशीही असली तरी कोणत्याही वयात व्यक्ती आपले स्वप्न पूर्ण करू शकतो, याचे अण्णा उत्तम उदाहरण आहेत.