अहमदनगर- महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी म्हणजेच, एस.टीने आता मालवाहतुकीच्या क्षेत्रात नवी भरारी घेतली आहे. कोपरगाव आगाराने शिर्डी संस्थानचे तूप पोहोचवण्याचा ठेका घेतला असून, मालवाहतुकीच्या पहिल्या खेपेला आज बस आगाराचे प्रमुख अभिजित चौधरी यांनी हिरवा झेंडा दाखवला.
राज्यात प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास महामंडळाने मान्यता दिली असून, आतापर्यंत ७२ बसेस मालवाहतुकीसाठी तयार झाल्या आहेत. एस.टी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक बस ट्रकमध्ये रुपांतरित केल्या आहेत. आजघडीला ३७२ बसेस मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
तुपाचा नवीन माल आणणार
कोपरगाव बस आगारही त्याला अपवाद नाही. त्यांनीही सिमेंट, शेतमाल वाहतूक करण्यास प्रारंभ केला असून त्याला दिवसागणिक प्रतिसाद वाढत आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थानला कोरोना साथीचा फटका बसला असून गत सात महिन्यापासून दर्शन रांग साई भक्तांसाठी बंद आहे. परिणामस्वरूप साई भक्तांसाठी सुरू असलेले भोजनालयही बंद असल्याने त्या साठीचा खरेदी केलेला कच्चा माल खराब होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे, तूप परत करण्याचा निर्णय संस्थानच्या त्रिसदस्यीय मंडळाने घेतला आहे, व त्या जागी नवीन माल आणणार आहे. कोपरगाव आगाराचे प्रमुख अभिजित चौधरी यांनी संस्थानशी संपर्क साधून हे काम कोपरगाव आगाराच्या मालवाहतूक शाखेला मिळवून दिले.
जवळपास १ लाख ४० हजाराचे काम
या अंतर्गत दहा टनच्या दहा खेपा शिर्डीहून हरिद्वारला मारण्यात येणार आहे. त्या बाजूनेही दर्जेदार तूप परत आणण्यात येणार आहे. जवळपास १ लाख ४० हजाराचे हे काम असल्याची माहिती आगार प्रमुख चौधरी यांनी दिली. पहिल्या खेपेचे विधिवत पूजन करून गाडीला (क्र. एम.एच.२० बी.एल. ०१४१) त्यांनी हिरवा झेंडा दिला. ही गाडी साधारण तीन दिवसांत हरिद्वारला पोहोचणार आहे. या प्रसंगी साहाय्यक कार्यशाळा अधिकारी अमोल बनकर, वाहतूक नियंत्रक उदय रोकडे, राज्यपरिवाहन कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष किरण बिडवे, वाहन चालक ई.बी. तांबोळी, अनिल कुमावत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा- पंचनामे थांबवा, शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या - डॉ. अजित नवले