अहमदनगर - कारोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 17 मार्चपासून साईबाबा मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. त्यानंतर भाविकांशी निगडित सर्व व्यवसाय बंद झाले. मात्र आता तब्बल दोन महिन्यानंतर शिर्डीतील व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, संचारबंदी संपत नाही, तोपर्यंत भाविक शिर्डीत येणार नाहीत. तर मग, शिर्डीतील व्यवसाय कसे चालणार, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे शिर्डीत 'थोडी खुशी ज्यादा गम' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
'सबका मालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येतात. याच भाविकांमुळे शिर्डीत सर्वच छोटे-मोठे व्यवसाय सुरू होते. मात्र संचारबंदीत सर्व व्यवसाय पूर्ण पण ठप्प झालेत. आज महसूल प्रशासनाने तब्बल दोन महिन्यांनंतर शिर्डीत काही चप्पल दुकाने, कपड्यांचे दुकान, भांड्याचे दुकान यासह अनेक व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र भाविकांशी निगडित इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत.
शिर्डीत मोठ्या प्रमाणात भक्त येत असल्याने अनेक व्यवसाय येथे सुरू झाले. ते करण्यासाठी अनेक बाहेरुनही नागरिक येथे आलेत. मात्र दुकानाचे भाडे हे पाचशे रुपये रोज ते पंचवीस हजार रुपयापर्यंत आकरले जात होते. त्यामुळे पर्यायाने भक्तांना महाग वस्तू मिळत होत्या. आता संचारंबदीत सगळेच बंद असल्याने काहींनी भाडे आकरले नाही, तर काही व्यावसायिकांना दुकाने पुन्हा सुरू झाली तरी भाडे देणे परवडणारे नाही. त्यामुळे आज शिर्डीचे मार्केट काही प्रमाणात सुरू झाले असले, तरी मरगळ आहे, असे म्हणावे लागेल. मात्र संचारबंदी धडा घेऊन मालकांनी भाडे कमी करावे आणि नगरपंचायतीनेही अतिक्रमाण वाढू न देता व्यवसाय करण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देणे महत्वाचे ठरणार आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.