अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात शिर्डीतील युवक अनेकांची मदत करत आहेत. नुकतेच शिर्डीतील साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात नवजात बाळ जन्माला आले. या युवकांनी बालकाच्या आईला आवश्यक कपडे व इतर साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यासाठी साहित्याचे किट तयार केले. हे कीट रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ मैथिली पितांबरे यांच्याकडे सुपूर्द करत कोरोनाच्या संकटात एक आदर्श उपक्रम राबविला आहे..
साईबाबा संस्थानचे दोन्ही रुग्णालय आजवर लाखो रुग्णांसाठी वरदान ठरले आहेत. कोरोनाच्या पाश्वभूमीवर मंदिर जरी भाविकांसाठी बंद असले, तरी संस्थानच्या दोन्ही रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात विशेष करून साईनाथ रुग्णालयाचा प्रसूती विभाग गरोदर महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या विभागाचा खास करून गरीब व गरजू महिलांना मोठा आधार होत आहे..
साईनाथ रुग्णालयातील सर्व सुविधा मोफत असल्याने वर्षभर हजारो महिला प्रसूती विभागाचा लाभ घेत असतात. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांना प्रसूतीनंतर नवजात बालकांसाठी विविध आवश्यक साहित्याची गरज असते. लॉकडाऊनच्या काळात असे साहित्य उपलब्ध होण्यास अडचण येऊ शकते, ही बाब शिर्डीतील युवकांच्या लक्षात आली. त्यांनी लगेचच आवश्यक कपडे, पावडर, साबण, तेल अशा साहित्यांच्या किट्स तयार करून आज दोन नवजात बालकांच्या मातेस मोफत दिले. यापुढील काळातही जन्मास येणाऱ्या बालकांच्या मातांसाठी उर्वरित किट्स वैद्यकीय अधिक्षिका डॉ मैथिली पितांबरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहेत.