अहमदनगर - उत्तर प्रदेशमधील हाथरस, बलरामपूर येथे युवतींवर बलात्कार आणि क्रूरपणे झालेल्या मारहाणीमुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एक पत्रक काढून या घटनेचा निषेध करत उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणले, ही एका मुलीची नव्हे तर मानवतेची हत्या आहे. आपला देश ऋषी मुनींचा देश आहे. जगात आपली संस्कृती श्रेष्ठ समजली जाते, असे असताना अशा घटनांमुळे आपली मान शरमेने खाली जात आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ज्यांनी कायदा-सुव्यवस्था सांभाळायची आहे. ती यंत्रणाच कमी पडत आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अण्णांनी व्यक्त केली आहे. असे कृत्य करणाऱ्या नराधमांना तातडीने न्याय प्रक्रिया पूर्ण करून फासावर लटकावले पाहिजे, असेही अण्णांनी पत्रकात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील निर्भया घटनेप्रमाणेच उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला होता. पीडित तरुणीवर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. 14 सप्टेंबरला या तरुणीवर अत्याचार झाला होता. ज्यानंतर आरोपींनी तिला मारुन टाकण्याचा प्रयत्नही केला होता. चार तरुणांनी तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ कापली आणि मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला. या अत्याचारानंतर तरुणी बेशुद्ध झाली. ती मृत झाली आहे, असे समजून चौघे आरोपी तिला तसेच टाकून निघून गेले.
मात्र, ती बचावली आणि सुरुवातीला उपचारांसाठी अलीगढच्या जे. एन. रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. सोमवारी तिची प्रकृती खालावल्याने दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिची प्रकृती आणखी ढासळली आणि मंगळवारी तिचा मृत्यू झाला. तर, हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली आहे.
हेही वाचा - सोन्यासारख्या चार एकर झेंडूवर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ, बाजारभाव नसल्याने शेतकरी वैतागले