अहमदनगर - नाताळच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. या महोत्सवात ३१ डिसेंबरला विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून मंदिर प्रशासन भक्तांच्या सेवेसाठी सज्ज असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुंगळीकर यांनी दिली आहे.
साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात ५८ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच, अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी साई धर्मशाळा आणि भक्तनिवास स्थानही उभारण्यात आलेले आहे. साईभक्तांना लाडू प्रसाद पाकिटांचा लाभ सुलभतेने मिळावा म्हणून गेट क्रमांक ४ जवळ अतिरिक्त लाडू विक्री काऊंटर सुरू करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - खळबळजनक! शिर्डीत 10 महिन्यात तब्बल 88 भाविक बेपत्ता; मानवी तस्करीचा संशय
उत्सव कालावधीत भक्तांच्या सोयीसाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, हनुमान मंदिराशेजारील साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप, साई आश्रम, साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार असून रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी ५० अतिरीक्त सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहेत. या महोत्सवात संगीत, साई भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.