शिर्डी (अहमदनगर) - शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत. तरी सलून, कॅन्टीन, पार्लर, पान मसाल्याची दुकाने बंद राहतील, असे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी स्पष्ट केले. तर गुरुवार आणि रविवार बंद ठेवण्यात येणारे व्यवसाय आता आठवडाभर 9 ते 5 या वेळेत सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे.
लॉकडाऊन काळात शिर्डी व्यावसायिक अडचणीत आले आहेत. म्हणून त्यांना शासनाने करांमध्ये सूट द्यावी, या मागणीचा ठराव माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला. व्यावसायिकांच्या भावना लक्षात घेऊन नगरपंचायतीने शासनाकडे ठराव पाठवावा, याबाबत मुख्यमंत्र्याकडे शिष्टमंडळ नेवून पाठपुरावा करणार आहेत, अशी ग्वाही विखे-पाटील यांनी दिली आहे.
मागील तीन महिन्यांपासून शिर्डीतील हॉटेल बंद आहेत. साई मंदीर कधी उघडणार? याबाबत सरकारकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. शहरातील सर्वच व्यवसाय साई मंदिराशी निगडीत आहेत. यामुळे व्यावसायिक अडचणीत आले असल्याची बाब ग्रामस्थांनी-विखे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच व्यावसायिकांना नगरपंचायतीने करांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी यावेळी विखे-पाटील यांच्याकडे केली.
याबाबत नगरपंचायतीने तातडीने विशेष सभा बोलाविली. तसेच व्यावसायिकांच्या निवेदनाच्या आधाराने करांमध्ये सूट मिळण्याबाबतचा ठराव शासनाकडे पाठविण्याची सूचना केली. या झालेल्या ठरावाचा पाठपुरावा मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे आपण शिष्टमंडळ नेवून करू, अशी ग्वाही विखे-पाटील यांनी दिली.
शहरातील हॉटेलच्या खोल्या शिर्डी संस्थानने भाडे तत्त्वावर घेण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय झाला. यासंदर्भात मालकांनी आपल्या हॉटेलचे ग्रेडेशन करून घेऊन याबाबत संस्थानकडे मागणी करावी, अशी सूचनाही विखे यांनी केली.
कोविड संकटात दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर अभियानाची घोषणा केली. व्यावसायिकांनी या पॅकेजचा अभ्यास करून लाभ घेण्याचे आवाहन करतानाच बँकांच्या कर्जाबाबत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची हॉटेल व्यासायिकांना घेऊन भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस नगराध्यक्षा अर्चना कोते, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, मुख्याधिकारी सतिष दिघे, कैलास कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, अभय शेळके, कमलाकर कोते, आदी. उपस्थित होते.