अहमदनगर - अहमदनगर शहराला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. अशाच एका ऐतिहासिक घटनेचा उजाळा काल साजऱ्या झालेल्या शिवजयंतीच्या निमित्ताने मिळाला आणि तब्बल सव्वाशे वर्षांनी शिवाजी मंदिर वजा स्मृतीस्थळावर सार्वजनिक शिवजयंती उत्सव पार पडला.
काय आहे या शिवजयंतीचा इतिहास?
ब्रिटिश काळात जुने कोर्ट म्हणून असलेल्या आणि सध्याच्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया शाळा म्हणून ओळख असलेल्या ठिकाणी सन१८९६ साली शिवाजी मंदिरात पाच शिक्षकांच्या पुढाकारातून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माधव हरी मोडक, गणपतराव दाभोळकर, शिवरामपंत भारदे, बंडोपंत धसे, रंगनाथ निसळ हे ते शिक्षक होत. यावेळी माधव हरी मोडक यांनी केलेल्या भाषणाने ब्रिटिश सरकार खवळले आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत पाचही शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात आले. यामुळे ब्रिटिशांविरोधात नाराजी होत चळवळ उभी राहत असतानाच पुण्यात प्लेगची साथ असताना ब्रिटिश अधिकारी रँडचा क्रांतिकारकांनी हत्या केली. त्यामुळे ब्रिटिश सरकार खवळले, संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण तप्त झाले. या कारणास्तव नगरमधील शिवाजी मंदिर वजा स्मृतीस्थळाकडे दुर्लक्ष झाले आणि काळाच्या ओघात हे स्मृतीस्थळ दुर्लक्षित राहिले. त्यामुळे नगर शहरातील स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यंदा गेली. तब्बल सव्वाशे वर्ष खंड पडलेला येथील शिवउत्सव पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला आणि काल शिवजयंतीदिनी कोरोना असल्याने अगदी मोजके शिवप्रेमी, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत या शिवाजी मंदिरात शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी केली.
छत्रपती चौथे शिवाजी महाराज आणि मंदिर
या शिवाजी मंदिर वजा स्मृतीस्थळाला कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा संदर्भ आहे. इंग्रजांनी अवघ्या वयाच्या २०व्या वर्षी छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा नगरच्या भुईकोट किल्ल्यात खून केला. त्यानंतर राष्ट्रभक्त नागरिकांनी त्यांचा मृतदेह शहरातील तत्कालीन जुन्या कोर्टासमोर (आजचे फिरोदिया हायस्कूल) आणून त्यांचा अंत्यविधी केला, तसेच त्या जागेवरच त्यांचे स्मृतीस्थळ असावे, म्हणून मंदिर बांधले. त्यालाच शिवाजी मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. याच शिवाजी मंदिरात १८९६साली पाच शिक्षकांनी छत्रपती शिवरायांचा एक फोटो आणून शिवजयंती उत्सव साजरा केल्याने ब्रिटिशांनी त्यांना सेवेतून काढून टाकले. त्यानंतर तब्बल सव्वाशे वर्ष खंड पडलेला सार्वजनिक शिवउत्सव पुन्हा सुरू झाला असून यापुढे दरवर्षी १९ फेब्रुवारीला या मंदिर वजा स्मृतीस्थळावर सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार असल्याचे नगरसेवक बाळासाहेब पवार, यशवंत तोडमल, सदाशिवराव निर्मळे, संपूर्णा सावंत, श्रीपाद दगडे, हेमंतराव मुळे, विशाल म्हस्के, श्रेयस सावंत यांनी सांगितले. यावेळी नगर शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे उपस्थित होते.