शिर्डी (अहमदनगर) - राज्य सरकारने सोमवारी (दि.१६) दिवाळीच्या पाडव्याला साई मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जगभरातील भाविकांना दिवाळीची अनोखी भेटच आहे. मंदिरे उघडण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने राज्यभरातील मोठ्या मंदिर व्यवस्थापनांची धावपळ होणार आहे.
पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले.
सुरुवातीला सहा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने रोज दर्शन
कोरोनामुळे 17 मार्चला दुपारी 3 वाजता साईमंदिर बंद करण्यात आले होते. तब्बल 242 दिवसांनी पाडव्याला साई मंदिर उघडणार आहे. सुरुवातीला सहा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने रोज दर्शन घेता येईल. हळुहळु ही संख्या वाढवण्यात येणार असून 65 वर्षांवरील वृद्धांना दर्शनाची अनुमती नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था असेल. भाविकाला ताप असेल तर त्यास तत्काळ साई संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात येईल. भाविक कोरोनाबाधित आढळला तर त्याला संस्थानच्या कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल. रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांमधून किमान पन्नास भाविकांना आठवडाभराने फोन करून तब्येतीविषयी माहिती घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
प्रसादालय आणि भक्तनिवास सुरू
भाविकांना समाधी आणि द्वारकामाई मंदिरात जावून दर्शन घेता येईल. मात्र, चावडी आणि मारुती मंदिरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. समाधी दर्शनानंतर बॅरिगेटींगमधून पाच नंबर गेटने भाविकांना बाहेर पाठवले जाईल. भाविकांना मंदिरात हार, प्रसाद आदी पूजा साहित्य नेता येणार नाही. सत्यनारायण, अभिषेक पूजा, ध्यानमंदिर, पारायण कक्ष बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना केवळ उदी देण्यात येईल, बुंदी प्रसाद किंवा दर्शन रांगेतील कॅन्टीनमध्ये चहा-बिस्कीटे मिळणार नाहीत. कोरोनाचा संसर्ग कमी होताच हळुहळु भाविकांना पूर्वीप्रमाणे दर्शन व अन्य सुविधा मिळतील. प्रसादालय आणि भक्तनिवास सुरू करण्यात येणार आहे. भक्तनिवासात रोज एक आड एक खोली देण्यात येणार आहे.