अहमदनगर (शिर्डी) - साई मंदिरातून दर गुरुवारी निघणारी साईबाबांची पालखी कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद आहे. आता ऑनलॉक सुरू झाल्याने ही पालखी पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिर्डीच्या ग्रामस्थांकडून होत आहे.
साईबाबा हयात असताना शिर्डीतील ग्रामस्थ पालखी शहरातून मिरवत द्वारकामाईतून चावडीत आणत. बाबांच्या महानिर्वाणानंतर साई संस्थान आणि ग्रामस्थ दर गुरुवारी समाधीमंदिरातून साईबाबांची प्रतिमा, पादुका आणि सटका (चिपळ्यांसारखे वाद्य) या वस्तू पालखीत ठेवून त्याची मिरवणूक काढतात. वर्षानुवर्षे साईंच्या मिरवणुकीची ही प्रथा ग्रामस्थांनी सुरू ठेवली आहे. साईबाबांचा हा पालखी सोहळा पाहण्यासाठी देशभरातून भाविक दर गुरुवारी शिर्डीत येतात. मात्र, कोरोनामुळे मार्च महिन्यापासून साई मंदिर आणि पालखी सोहळा दोन्ही बंद ठेवण्यात आले आहे.
कमीतकमी पुजारी व पालखी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिति हा पालखी सोहळा सुरू करावा. भाविकांना साईबाबांच्या पालखीचे दर्शन घर बसल्या मिळावे, यासाठी लाइव्ह दर्शन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी शिर्डीच्या ग्रामस्थांनी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांच्याकडे केली आहे.