शिर्डी ( अहमदनगर ) : शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत ज्या मार्गाने प्रवास केला होता. त्या उर्जामय वाटेवर भाविकांनी देखिल भम्रण करावे अशी संकल्पना घेवून शिर्डी परिक्रमा या महोत्सवाचे शिर्डी ग्रामस्थ व 'ग्रीन एन क्लीन शिर्डी' यांच्यावतीने आयोजत करण्यात आले ( Shirdi Parikrama Celebrated In Shirdi ) होते. गेल्या दोन वर्षांपासून शिर्डी परिक्रमाचे आयोजन करण्यात येत असून यंदाचे तिसरे वर्ष आहे.
महिलांची उपस्थिती लक्षणीय
मागील दोन वर्षापूर्वी कोरोना काळात काही बंधन असल्याने सध्या पद्धतीने शिर्डी परिक्रमा साजरी करण्यात आली होती. यंदाचा वर्षी कोरोनाचे निर्बंध हटल्याने मोठ्या उत्साहात शिर्डी परिक्रमा काढण्यात आली. शिर्डी ग्रामस्थ आणि 'ग्रीन एन क्लीन शिर्डी' यांच्यावतीने शिर्डी परिक्रमा एका उत्सवाप्रमाणे साजरी करण्यात येत असून, यंदाचे शिर्डी परिक्रमेचे तीसरे वर्षा आहे. यंदाच्या वर्षी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
१३ किलोमीटर अंतराची परिक्रमा
आज पहाटे 6 वाजता शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांच्या उपस्थितीत खंडोबा मंदिरात महंत रामगिरी महाराज आणि मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा करत परिक्रमेस सुरवात करण्यात आली. साईबाबांची प्रतिमा मुख्य रथात ठेवण्यात आली होती. याच बरोबरीने देशभरातील भाविकांसह खासदार तसेच साधू-संत, भाविक, विद्यार्थी व परिसरातील ग्रामस्थ परिक्रमेत सहभागी झाले होते. त्याचबरोबर शिर्डी परिसरातील शाळेतील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, शाळेच्यावतीने विविध आकर्षक देखावे देखील सादर करण्यात आले होते. तसेच शिर्डी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हातात फलक आणि वृक्ष घेत 'झाडे जगवा झाडे वाचवा' हा संदेश या परिक्रमेच्या माध्यमातून दिला आहे. या परिक्रमेला खंडोबा मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. नगर - मनमाड महामार्ग, रुई रोड नंतर लुटे वस्ती मार्गाने, साकुरी शिवमार्गे अशी 13 किलोमीटर अंतराची भव्यदिव्य शिर्डी परिक्रमा काढण्यात आली. परिक्रमा द्वारकामाई जवळ येत समाप्त झाली.
ऊर्जा तसेच पुण्य मिळते
धार्मिक तिर्थक्षेत्राची नगर प्रदक्षिणा केल्याने उर्जा तसेच पुण्य मिळते अशी भाविकांची धारणा असते. यामुळे शिर्डीत आलेले काही भाविक साई दर्शनानंतर शिर्डीची नगर प्रदश्रिणा करत असत. भाविकांची आस्था लक्षात घेता ग्रीन एन क्लीन शिर्डीने यात पुढाकार घेत शिर्डी परिक्रमा समारोह साजरा करत भव्यदिव्य स्वरुप दिले आहे. प्रथम वर्षात 15 मार्च 2020 रोजी या शिर्डी परिक्रमेचा श्रीगणेशा करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी यात सहभाग घेत आकर्षक देखावे तसेच साईबाबांचा रथ अशी जंगी फेरी काढण्यात आली होती. त्यावेळी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा अतंर्गत आयोजक डॉ. जितेंद्र शेळके आणि अजित पारख यांच्यावर कारवाई देखिल करण्यात आली होती. मात्र, हे साईबाबांचे काम असून, प्रथम ‘साई नंतर सर्व काही’ या उपमेप्रमाणे आयोजक कारवाईला सामोरे गेले होते.
दहा हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती
दरम्यान, साईसंस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, जेष्ठ नेते कैलासबापू कोते, माजी नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, साई संस्थानचे विश्वस्त आदीसह शिर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी शिर्डी युवा ग्रामस्थ, द्वारकामाई मित्र मंडळ, सन्मित्र मंडळ, छत्रपती शासन, क्रांती युवक मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ, यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक असे सुमारे दहा हजारांहून जास्त भाविक उपस्थित होते.