शिर्डी (अहमदनगर)- कोरोनाच्या संसर्गाला आटोक्यात आणण्याकरता राज्यातील अनेक जिल्ह्यांत प्रशासनाने टाळेबंदी लागू केली आहे. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरता शिर्डीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढील दहा दिवस टाळेबंदी पाळण्याचा निर्णय घेतला आहे़.
शिर्डीत गेल्या तीन दिवसांत 24हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून साईबाबांचे मंदिर बंद असल्याने बहुतांश शिर्डी बंद आहे. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांकडून पूर्णपणे टाळेबंदी पाळण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक-
गेल्या काही दिवसांपूर्वी शिर्डीत एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होता. आठ दिवसापूर्वी कोरोना बाधितांची संख्या केवळ सात होती. मात्र तीन दिवसात कोरोनाच्या संसर्गाचा गुणाकार होताना दिसत आहे. मंगळवारी एकाच कुटुंबात सात तर बुधवार नऊ आणि गुरुवारी आठ जणांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली आहे.
30 जण साईआश्रम येथील विलगीकरण कक्षात…
आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार कोरोनाचे नवे चार रुग्ण वाढले आहेत. यात व्यापारी, पत्रकार, फोटोग्राफर आणि घरकाम करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसात कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील 30 जणांना साईआश्रम येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे.
एकीकडे प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. शिर्डीतील ग्रामस्थांनीही प्रशासनाच्या प्रयत्नाला पूरक असा निर्णय घेतला आहे. टाळेबंदीच्या नियमानुसार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच अत्यावशक सेवेची दुकाने सुरू असणार आहेत.