अहमदनगर : आज पासून आदिशक्ती आदिमायेचा जागर नवरात्र उत्सवाच्या (Sharadiya Navratri festival Ahmednagar) निमित्ताने होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत समजल्या जाणाऱ्या मोहटादेवी गडावर आदिशक्ती रेणुकामाता मोहटा देवीचा नवरात्र उत्सवास सुरुवात (Navratri festival at Mohtadevi Fort) झाली आहे. घटस्थापणेपूर्वी आई मोहटादेवीचा मुखवटा मोहटा गावातून वाजत-गाजत गडावर आणण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सुनील श्रीधर गोसावी यांनी सपत्नीक नीता सुनील गोसावी यांच्या हस्ते देवीची घटस्थापना विधीवत पूजा करून करण्यात आली. (Ahmednagar News)
देवस्थानाचा विकास आराखडा तयार - मोहटादेवी हे राज्यातील देवीभक्तांचे जागरूक स्थान म्हणून प्रसिद्ध असून राज्यभरातून भाविक लाखोंच्या संख्येने नवरात्रोत्सव निमित्ताने गडाला भेट देत असतात. भक्तांना जास्तीत-जास्त सुविधा मिळाव्यात आणि गड पंचक्रोशीत विकासकामांसाठी जवळपास अडीचशे कोटींचा विकास आराखडा शासनाने मंजूर केला आहे. येथे सरकार आणि दानशूर भक्तांच्या सहकार्याने परिसरात हॉस्पिटल, शैक्षणिक केंद्र, ध्यानधारणा केंद्र आदींचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आल्याचे मोहटादेवी देवस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी आणि विश्वस्त भीमराव पालवे, अशोक दहिफळे, आजीनाथ आव्हाड, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, कार्यकारी अधिकारी भणगे यांनी सांगितले आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबईतून भक्तांचा ओढा - आदिशक्ती मोहटादेवी च्या दर्शनासाठी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई स्थित भक्त लाखोंच्या संख्येने दरवर्षी न चुकता येतात. जिल्ह्यातील जागृत आणि भक्तांच्या नवसाला पावणारी आई रेणुकामाता मोहटादेवीच्या दर्शनाला राज्यातील विविध भागातून पायी मशाल घेऊन येणारे भक्त आहेत. देवीला जागर म्हणून नऊ दिवस उभे राहून खडा पहारा देणारे भक्त आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटात अनेक पारंपरिक प्रथांना फाटा देत केवळ दर्शनाची मुभा देण्यात आली होती.
जिल्हा न्यायाधीश पाहतात देवस्थानचा कारभार - रजाकाराच्या काळात या परिसरात म्हशींची चोरी झाली, तेंव्हापासून आज पर्यंत पंचक्रोशीत गाई-म्हशीचे दूध, तूप विकले जात नाही. गेल्या काही वर्षांत देवस्थानने मंदिराचा जीर्णोद्धार केला असून भव्य अशी मंदिराची देखणी वास्तू उभारली आहे. मंदिराचा कारभार हे जिल्हा न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चालतो. सातव्या माळेला या ठिकाणी यात्रा भरते. मात्र यंदा यात्रेला परवानगी नाही. नऊ दिवस भक्तांची संख्या ही हजारोंच्या संख्येने असते. ती केवळ रोज पाच हजारावर आणण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने आज घटस्थापना होऊन देवीचा नवजागर सुरू झाला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भाविक भक्तांसाठी विविध सोयी सुविधा देवस्थान कडून पुरवण्यात आल्या आहेत.