अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील पारनेर येथे पवार यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी बोलताना पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारला निशाण्यावर घेत हे सरकार सीबीआय, ईडी, पोलीस आदींच्या माध्यमातून सत्तेचा गैर वापर करत असल्याचा आरोप केला.
आपण कशाला घाबरत नाही. गुन्हे दाखल करा नाही तर अटक करा पण शेतकरी, कामगार, युवक आदी प्रश्नावर आपण बोलत राहू. निवडणुकीच्या निमित्ताने या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे काम जनतेने करावे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
हेही वाचा - शेवटी व्हायचं तेच झालं! भाजप-सेना युती तुटली? आता आमने-सामने लढाई
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ पारनेर येथील बाजरतळावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा - कणकवलीत राणेंना भिडणारे काँग्रेसचे राणे आहेत तरी कोण?
आमच्या सरकारच्या काळात अनेक औद्योगीक वसाहती उभ्या राहिल्या. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली, गुन्हेगारी कमी राहिली. मात्र, हे सरकार केवळ घोषणा करत आहे. उद्योगधंदे बंद पडून हजारो युवक बेरोजगार होत आहेत. फसवी कर्जमाफीमुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे या सरकारला हटविण्याचे काम जनतेला करावे लागेल, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.