अहमदनगर - नववर्षाच्या स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो साईभक्तांनी शिर्डीच्या साई मंदिरात हजेरी लावली. रात्री बारा वाजता भाविकांनी साईंचे मुखदर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केल्याने सुरक्षा रक्षकांना कसरत करावी लागली.
लहान मुले, वृद्ध आणि तरुण अशा सर्वच वयोगटातील भाविकांची मांदियाळी साई मंदिरात जमली होती. नविन वर्षानिमित्त मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे लाखो भाविकांना रात्रीचे दर्शन घेता आले.
हेही वाचा - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'गेट ऑफ इंडिया' येथे नयनरम्य रोषणाई
साई बाबा मंदिर परिसरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाविकांनी नवीन वर्षात सुख-शांती आणि स्वास्थ्यासाठी साईबाबांना साकडे घातले. साईबाबा संस्थानानेही नवीन वर्षानिमित्त साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरूस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवले आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. भक्तांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिठाई वाटून नवीन वर्षाचे स्वागत केले.