अहमदनगर - राज्यात आदर्शग्राम म्हणून ओळख असलेले हिवरेबाजार ग्राम आज कोरोनाच्या महामारीत देखील सुरक्षित आहे. मुंबई, पुणे, ठाणे आदी मुख्य शहरात वसलेले हिवरेबाजारचे नागरिक गावाकडे परतल्यानंतर देखील केवळ स्वयंशिस्तीमुळे हिवरेबाजारमध्ये एकही पॉझिटिव्ह आढळला नाहीय.
या परिसरात पाऊस कमी पडतो मात्र, हे गाव बारामाही हिरवाईने नटलेले असते. नगर जिल्ह्यात सर्वाधिक दरडोई उत्पन्न देखील हिवरेबाजारमध्येच आहे. गावात पंचक्रोशीतल्या अनेक लोकांची वर्दळ असते. सध्या शहरातील विविध भागाती व्यक्ती गावात परतत आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटात देखील हिवरेबाजार अगदी निर्धास्त आहे. हे सर्व स्वयंशिस्तीमुळे साध्य झाल्याचे सरपंचांनी सांगितले.
गावच्या पारावर जमताना देखील सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत असल्याने प्रादुर्भाव टाळण्यास हातभर लागतोय.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावातील सर्व नागरिकांची नियमित तपासणी सुरू केली. तसेच गावातील सर्व व्यक्तींच्या आरोग्यावर नरज ठेवण्यात आली.
गावाकडे परतणाऱ्या शहरी नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होण्याचं प्रमाण वाढलयं. मात्र या संकटाकडे डोळसपणे पाहात ग्रामस्थांनी आरोग्य विभागाने दिलेले निर्देश पाळले आहेत.