अहमदनगर - नेवासा येथे कोरोनाच्या संदर्भात पंचायत समीती सभागृहात बैठक सुरु असतांना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर वंचित बहूजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ उडाला.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर शाई फेकण्यासाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांना पोलिसांनी वेळेमध्ये रोखलं. नेवासा पंचायत समिती कार्यालयामध्ये गुरुवारी १५ एप्रिल रोजी तालुक्यामध्ये वाढत असलेले रुग्ण संख्या या संदर्भात तसेच उपाय योजना संदर्भात अधिकारी यांच्यासोबत शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांची बैठक सुरू होती. यावेळी दुपारी बाराच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी खासदार लोखंडे यांचा निषेध करत शाई फेकण्यासाठी आणली होती. मात्र याच्या अगोदर पोलिसांनी त्यांना रोखून त्यांच्याकडे असलेल्या शाईच्या बाटलीसह ताब्यात घेतले.
सुखदान यांचे म्हणणे होते, की नेवासा तालुक्यामध्ये सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढते आहे. त्यासाठी तुम्ही खासदार या नात्याने तालुक्यामध्ये एकही सेंटर सुरू करू शकले नाही, ते सुरू करावे. तालुक्यामधील नागरिकांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाहीत. तसेच हॉस्पिटलला इंजेक्शन उपलब्ध झालं नाहीत यासह इतर उपाययोजना तुम्ही का करू शकले नाही? असा सवाल विचारत त्यांनी निषेध करून शाई फेकण्याचा प्रयत्न केला.
काही वेळानंतर संजय सुखदान यांना सविस्तर चर्चा करण्यासाठी मिटिंगमध्ये बोलावून सुखदान यांचे म्हणणे खासदार लोखंडे यांनी ऐकून घेतल्याने तणाव निवळला.
हेही वाचा -कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र