अहमदनगर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील 17 मार्चपासून शिर्डीचे साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. दोन महिन्यांनंतर आता मंदिर दर्शनासाठी खुले होणार असल्याचे वृत्त काही ठिकाणी पसरले होते. येत्या 1 जूनपासून मंदिर उघडणार असल्याचे मेसेजेस व्हायरल झाले. अखेर साई मंदिर प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे.
शासनाचे आदेश येत नाही, तोपर्यंत साई मंदिर उघडणार नसल्याचे संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत असताना मंदिर उघडण्याचा कोणताही निर्यण घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या शिर्डीतदेखील कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे साईबाबा संस्थान विश्वस्त मंदिर बंद ठेवणार आहेत.
मंदिर उघडण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेने अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी भक्तांना आणखी काही काळ थांबावे लागणार आहे. मात्र ऑनलाइन दर्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने भक्तांनी त्याचा लाभ उठवावा, असे संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.