अहमदनगर - कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुंबईत पार्टली लॉकडाऊन केले जात आहे. मात्र, दररोज लाखभर लोकांचा वावर असलेल्या शिर्डीत केवळ साई मंदिर दर्शनासाठी बंद केल्याने स्वयंघोषित लॉकडाऊन झाले आहे. शिर्डी विमानतळावर रोज साधारण १५ विमान येतात. साईमंदिर बंदचा फटका विमानांच्या उड्डाणांवरही झाला आहे. गुरुवारी फक्त ६ विमानांचे लँडिंग झाले. या विमानातून येणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. येत्या २ दिवासात विमानतळावरील वाहतूकही पूर्णपणे थांबेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. त्यात धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहे. यात महत्वाचे असे शिर्डीचे साईबाबा मंदिर मंगळवारी दुपारपासून बंद करण्यात आल्यानंतर शिर्डीतील भाविकांची संख्या कमालीची घटली आहे. साईंच दर्शनच बंद असल्याने अनेकांनी शिर्डीत येणं टाळलय. त्यामुळे या भक्तांवरच अवलंबून असलेले अनेक व्यवसाय आपोआपच बंद झाले आहेत. परिणामी शिर्डीत स्वयंघोषित संचारबंदीसारखी परीस्थीती निर्माण झाली आहे.
दुसरीकडे शिर्डी विमानतळावर दररोज १५ विमान येतात तर, १५ जात असून त्यात जवळपास साडेतीन हजार भाविक असतात. मात्र, कोरोनाचा प्रकोप पाहता ती संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. साई मंदिर बंद झाल्यानंतर शिर्डीतून विमानाद्वारे बाहेर जाणाऱयांची संख्या अधिक आहे. तर, एक विमानात येणाऱ्या प्रवाशांची संख्या केवळ दोन-चारच आहेत. एअर इंडियाने आपली विमानसेवा येत्या ३१ तारखेपर्यंत स्थगित केली आहे. तर, स्पाईसजेटने ६ फ्लाईट रद्द केल्या आहेत.
हेही वाचा - अहमदनगरमध्ये कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह; प्रशासन सतर्क
शिर्डी विमातळात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी येथे टॅक्सीसेवा सुरू केल्या आहेत. आता विमानतळावर प्रवाशीच येत नसल्याने त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून गाडीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिर्डीत अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना दिवसाकाठी २०० ते २ हजार रुपये भाडे आकारून दुकाने लावू दिली जातात. मात्र, आता व्यवहारच ठप्प झाल्याने हे भाडे कसे द्यायचे असा मोठा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झालाय.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : अहमदनगरमध्ये २२ इराणी-जपानी नागरिक अडकले