शिर्डी- कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी आलेल्या महापुरामुळे येथील नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याच्या काना-कोपऱ्यातून मदत होत असून शिर्डी ग्रामस्थानांबरोबर साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
शिर्डीतील ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन यांच्या वतीने शिर्डी शहरातून कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही फेरी साईबाबांच्या तीन नबर गेट समोर येऊन थांबली असता अनेक साई भक्तानी मदतीसाठी हात पुढे केला. शिर्डी ग्रामस्थांनी तब्बल एक लाख तीस हजार रुपयांच्या वर रोख रक्कम जमा केली आहे. हे पैसे जनकल्याण समिती उत्तर नगर जिल्हा यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिर्डी शहर तसेच राहाता, राहुरी, श्रीरामपुर संगमनेर तालुक्यातील वेगवेगळ्या संघटनेकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तुंची जमवाजमाव करूण टॅम्पो पूरग्रस्तांकडे रवाना करण्यात आला आहे. राहुरी शहरातील मराठा एकीकरण समिती, नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे मिञ मंडळ, राहात्यातील हनुमाम चाळीसा मंडळ, संगमनेरातील जयहिंद युवा मंचने पुढाकार घेत गोळ्या-ओषधांबरोबरच सुके पीठ, खाण्याचे पदार्थ, नवीन कपडे आणि इतर उपयोगी वस्तू जमा करून पूरग्रस्त भागात पाठवून मदत केली आहे.