अहमदनगर (शिर्डी) : 'सबका मालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांना भाविक आपल्या स्वेच्छेनं सोने, चांदी, रोख रक्कम दान करतात. मात्र बंगळुरू येथील एका साईभक्त परिवारानं आपली शिर्डीतील साधारणः एक कोटी रुपये किंमतीची दोन मजली इमारत साईबाबा संस्थानला दान स्वरूपात दिलीय.
शिर्डीत शाळा सुरू करण्याचं होतं स्वप्न : बंगळुरू येथील जयप्रकाश माकाम (Jayaprakash Makam) हे साईबाबांचे निसमभक्त होते. साईबाबांवर श्रद्धा असल्याने माकाम बंगळुरू येथून महिन्यातून दोन वेळा शिर्डीत दर्शनासाठी येत होते. साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमी यावं लागत असल्याने, माकाम यांनी शिर्डीत राहण्यासाठी घरही घेतलं. मात्र शिर्डीतील शालेय विद्यार्थीसाठी शाळा सुरू करण्याचा माकाम यांना विचार आला. माकाम यांनी शिर्डीतील साकुरी शिव येथे साडेतीन गुंठे जमीन खरेदी केली. मात्र जयप्रकाश माकाम यांचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानं त्यांचं शिर्डीत शाळा सुरू करण्याचं स्वप्नन अधुरं राहिलं.
पी. शिवशंकर यांना दिला अर्ज : मयत जयप्रकाश यांच्या पत्नी आणि मुलाने वडिलांचं शिर्डीत शाळा सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शिर्डीत शाळा बांधण्यासाठी घेतलेल्या साडेतीन गुंठे जमिनीवर दोन मजली इमारत बांधलीय. ही इमारत साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात देण्याची इच्छा, मयत जयप्रकाश माकाम यांच्या पत्नी शामला यांनी व्यक्त केली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर (P. Shiva Shankar) यांना अर्ज देण्यात आला. तसंच या इमारतीचा शैक्षणिक कामासाठी वापर व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. येत्या 29 नोहेंबरला इमारतीची विधिवत पूजा करून साईबाबा संस्थानला ही इमारत सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती, शामला माकाम यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली.
इमारत कुठल्या कामासाठी वापरणार : मयत जयप्रकाश यांचं राहिलेलं आधुरं स्वप्न, पत्नी शामला आणि मुलानं पूर्ण केलं. मात्र साईबाबा संस्थानला शैक्षणिक कामासाठी दान स्वरूपात दिलेली ही इमारत साई संस्थान शैक्षणिक कामासाठी वापरणार का? असाही प्रश्न आता उपस्थिती होतोय. कारण साईबाबा संस्थानकडे शिर्डीत साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूल, साईबाबा कन्या विद्या मंदिर, ज्युनियर, सिनिर कॉलेज चालवले जातात. यासाठी साई संस्थाननं कोट्यवधी रुपये खर्च करून इमारती उभारल्यात. यामुळं आता या साईभक्त परिवारानं दान स्वरूपात दिलेली इमारत, साई संस्थान कुठल्या कामासाठी वापरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -