अहमदनगर: देश विदेशातील भाविकांची साईच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. शिर्डीत आलेला भक्त साईचरणी आपापल्या परीने रोख अथवा वस्तु स्वरुपात दान चढवत असतो. यात दाक्षिणात्य भाविकांचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. आंध्रप्रदेश राज्यातील गोदावरी जिह्यातील सूर्यनारायण चक्का या परिवाराने आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिर्डी साईबाबांना तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम दान स्वरूपात दिली आहे.
अशा प्रकारे केले निधीचे दान: आषाढी एकादशी निमित्ताने आंध्रप्रदेश राज्यातील गोदावरी जिह्यातील सूर्यनारायण चक्का या साई भक्त परिवाराने आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर चक्का परिवाराने साईबाबा मंदिर परिसरातील संस्थानच्या देणगी कार्यालयात जाऊन 23 लाख रुपयांची रोख रक्कम देणगी दिली आहे. ही देणगी साईबाबा संस्थान मार्फत मोफत चालवण्यात येत असलेल्या श्री साईबाबा प्रसादलयासाठी 5 लाख रुपये तसेच साई संस्थान मार्फत चालविल्या जात असलेल्या साईनाथ रुग्णालय आणि सवलतीच्या दरात उपचार केल्या जाणाऱ्या साईबाबा रुग्णालयासाठी 18 लाख रुपय असे एकूण 23 लाख रुपयांची रोख स्वरूपात देणगी दिली गेली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी चक्का परिवाराचा शॉल, साई मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला.
म्हणून निधी दान: साईबाबांशी आमचे भावनिक नाते आहे. साईबाबांचा आशिर्वाद आमच्यावर कायम आहे. साईबाबा आम्हाला हजारो हाताने देतात. त्यातूनच आम्ही शिर्डीला येणाऱ्या भाविकांच्या अन्नदानासाठी तसेच येथे रुग्णालयात येऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी दान दिल्याचे चक्का परिवाराच्या सुनबाईं गायत्री नयना यांनी सांगितले आहे.
दान निधीतून या सुविधा: शिर्डीच्या साई चरणी दररोज पन्नास हजार ते एक लाख भाविक येत दर्शन घेतात. यातील बहुतांश भाविक रोख स्वरुपात अथवा दक्षिणा हुंडीत मोठे दान करत असतात. साईबाबांना भक्तांनी दान केल्याचा आकडा हा दररोज सरासरी एक कोटी रुपयांच्या आसपास असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीतील दीड महिन्यात भाविकांनी साईचरणी तब्बल पंचेचाळीस कोटीचे दान केले आहे. साईभक्तांकडून आलेल्या या दानातूनच साई संस्थान भक्तांसाठीच्या सुविधा आणि कर्मचारी पगार करण्या बरोबरच शिर्डीत एक मोफत रुग्णालय चालवते. याच बरोबरीने दररोज पन्नास हजार भक्त साई संस्थानच्या प्रसादालयात मोफत भोजन घेतात.
हेही वाचा:
- Ashadhi Ekadashi 2023 : शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी एकादशीनिमित्ताने शिर्डीत भाविकांची गर्दी
- Ashadhi Ekadashi 2023: बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे- मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे
- Ashadhi Wari 2023 : चंद्रभागेच्या तिरी लाखो भाविकांची गर्दी, भाविकांच्या गर्दीने फुलली विठ्ठू नगरी