अहमदनगर - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. अशात १७ मार्च ते ३ मे अशा ४८ दिवसाच्या कालावधीत साईभक्तांकडून २ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपयांची ऑनलाईन देणगी संस्थानाला प्राप्त झाली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी याबद्दलची दिली.
साईबाबांची महिमा व त्यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहोचली असून त्यांचा भक्त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. १७ मार्चपासून मंदिर बंद ठेवण्यात आले असल्याने याकाळात संस्थान संकेतस्थळ व मोबाईल अॅपद्वारे थेट ऑनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्त घर बसल्या घेत आहेत.
१ लाख १२ साईभक्तांनी संस्थानचे मोबाईल अॅप डाऊनलोड केले आहे. तर संकेतस्थळावर दररोज सुमारे ८ ते ९ हजार साईभक्त भेट देत आहेत. साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी ही साईभक्तांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरु ठेवली आहे. जगाच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून साईभक्त संकेतस्थळाद्वारे व मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन देणगी संस्थानाला पाठवत आहेत.