शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्थानच्या वतीने साईधर्म शाळा येथे वय वर्ष 45 पुढील जे विविध व्याधींनी ग्रस्त आहेत, अशा व्यक्ती व वय वर्ष 60 पुढील सर्व व्यक्तींसाठी कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचा शुभारंभ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
शासनाने ठरविलेल्या दरात उपलब्ध
ही लस शासनाने ठरविलेल्या रुपये 250 या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या वतीने दररोज 100 लोकांना ही लस देण्यास परवानगी दिलेली आहे. यामुळे जास्तीत-जास्त लोकांनी या लसीकरण केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून आपल्याला देण्यात येणाऱ्या तारखेस व वेळेस उपस्थित राहुन लसीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, वैद्यकीय अधिकारी व परिचारक-परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.