शिर्डी (अहमदनगर) - येथील साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, संचलित रुग्णालयात आरटी-पीसीआर लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबमध्ये कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी नागपूर येथील एम्स रुग्णालय आणि आयसीएमआर यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे लवकरच कोरोना संशयितांची चाचणी करण्यात सुरुवात होणार आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
हेही वाचा - धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल
मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात आलंय उद्घाटन -
बगाटे म्हणाले, सध्या कोरोना विषाणुची दुसरी लाट सुरू आहे. मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रुग्णांकरिता आरोग्य सेवेवर ताण पडत होता. त्यातच सुरुवातीचे काळात कोरोना रुग्णांचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर लॅबची कमतरता होती. यामुळे देणगीदार साईभक्तांच्या देणगीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व संस्थानच्या वतीने आरटी-पीसीआर लॅब उभारण्यात आली. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण व आरटी-पीसीआर लॅबचे कार्यान्वयन चाचणी कार्यक्रम ऑनलाइन पार पडल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - 'बाजार बंद करा' म्हणताच, फळ विक्रेत्यांनी केला पोलिसांवर हल्ला, डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न
२४ तास सुरू करण्याचे नियोजित
या लॅबकरीता आयसीएमआरकडून मान्यता मिळणेकामी एम्स नागपूर यांचेव्दारे प्रस्ताव पाठवुन पाठपुरावा करुन त्यांच्याकडून मान्यता मिळालेली आहे. या लॅबमध्ये ८ तासात एकुण ६०० चाचण्या करण्यात येणार आहेत. भविष्यात ही लॅब २४ तासांसाठी कार्यान्वित करण्याचे नियोजित आहे. या आरटी-पीसीआर लॅबमध्ये कोरोना रुग्णांची स्वॅब तपासणी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगुन शिर्डी व परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांना या लॅबचा फायदा होणार आहे. कोरोना बाधितांचे लवकर निदान होऊन त्यांना तातडीने उपचार मिळणे शक्य होणार आहेत.