अहमदनगर- उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपुरमध्ये तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शहरातील निलक्रांती चौकात जोरदार निदर्शने करत रास्तारोको करण्यात आला. यावेळी आठवले गटाचे नेते अजय साळवे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तर प्रदेशमध्ये वारंवार ज्या पद्धतीने मागासवर्गीय युवती- महिलांवर अत्याचार होत आहे आणि त्यांना क्रूरपणे मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या या घटना निषेधार्ह आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी करून त्यांना फासावर लटकवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना पक्षाचे अजय साळवे म्हणाले की, आरपीआय आठवले गट हा पॅंथर असून या झोपलेल्या पॅंथरला जागे करू नका. या आरोपींना शिक्षा झाली नाही तर हा पँथर जागा होईल आणि मोठ्या प्रमाणावर तीव्र असे आंदोलन केले जाईल. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनानंतर सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.