शिर्डी (अहमदनगर) - हॉटेल व्यावसायिक व सुरक्षा एजन्सी चालकाच्या घरावर सहा ते सात जणांच्या टोळीने दरोडा टाकला. यावेळी चोरांनी 25 तोळे सोने आणि अडीच लाखांच्या रोकडसह जवळपास पंधरा लाखांचा ऐवज लुटून नेला. शहरातील आशिष अनिल गोंदकर (वय-२३) यांच्या हरीओम बंगला, नाला रोड, सितानगर येथे ही घटना घडली.
हा बंगला राष्ट्रवादीचे नेते रमेशराव गोंदकर यांच्या बंगल्याच्या मागील बाजुस आहे. आशिषच्या वडीलांचे 16 वर्षांपुर्वी निधन झाले. महिनाभरापुर्वी त्याच्या आईचेही निधन झाल्याने ते पुण्यातील नोकरी सोडून आजी ताराबाई गोडगे (वय-५८) आणि आजीची आई सुगंधाबाई कडलग (वय ७५) यांच्याबरोबर शिर्डीत राहातात. त्यांचा हॉटेलचा वडीलोपार्जित व्यवसाय असुन त्यांची सुरक्षा रक्षक पुरवणारी एजन्सीही आहे.
फिर्यादीत काय म्हटले?
मध्यरात्री अडीचच्या सुमारास दरोडेखोरांनी घराचा मुख्य दरवाजा टॅमीच्या सहाय्याने तोडून प्रवेश केला. लोखंडी रॉड, चाकु आदीचा धाक दाखवुन त्यांनी आशिषचे हातपाय बांधुन ठेवले. अन्य दोन्ही वृद्ध महिलांनाही धमकावुन त्यांच्या अंगावरील सोने काढून घेतले तसेच कपाटांची उचकापाचक करून जवळपास 25 तोळे सोने, तीन घड्याळे, दोन मोबाईल व अडीच लाखांची रोकड लुटून नेली. दरोडेखोर 25-30 वयोगटातील असुन त्यांनी रूमालाने तोंड बांधलेले होते. तसेच ते मराठी व हिंदीत बोलत होते, असे आशिषने फिर्यादीत म्हटले आहे.
दरोडेखोर गेल्यानंतर आजीने आशिषचे हातपाय सोडवले. यानंतर आशिषने मित्र सुशांत औताडे व पोलिसांना कळवले. घरावर पाळत ठेवून हा प्रकार केला असण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने बंगल्याला सुरक्षा रक्षक नव्हता. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाला गती देण्यात आली असुन सहाय्यक निरीक्षक प्रविण दातरे पुढील तपास करत आहेत. या घटनेने शहरात घबराट पसरली असुन पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक दरीत कोसळला, एक ठार तर 3 गंभीर जखमी