अहमदनगर - कोरोना रुग्णाला योग्य उपचार न मिळाल्याने जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला. रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या काचाही फोडल्या. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.
नगर तालुक्यातील एक कोरोना संसर्ग झालेला रुग्ण जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. आज त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने आणि प्राणवायूची मात्रा कमी झाल्याने रुग्ण दगावला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. रुग्णाच्या नातेवाईकांनी यावरून चांगलाच गोंधळ घातला. काहींनी अतिदक्षता विभागाच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयांमध्ये गोंधळाचे आणि घबराटीचे वातावरण पसरले होते.
जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवला-
दरम्यान या घटनेनंतर तोफखाना पोलीस जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाने तोडफोड प्रकरणी पोलिसांकडे दुपारपर्यंत तक्रार दिलेली नव्हती. तसेच तोडफोड करणारे नातेवाईक घटनेनंतर रुग्णालयातून निघून गेले होते. याबाबत जिल्हा रुग्णालयाकडून माहिती दिली जात नव्हती.
हेही वाचा- अखेर देवाचं दार उघडलं! मुंबईत मंदिरात बनवले कोविड सेंटर