अहमदनगर – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी युक्तिवाद झाला होता. गुरुवारी या अर्जावर निर्णय देताना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी बाळ बोठे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे बोठेच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता बाळ बोठे याला पोलीस कधी अटक करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
असा झाला दोन्ही बाजूने युक्तिवाद
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे व दुसरा आरोपी सागर भिंगारदिवे एकमेकांच्या संपर्कात होते. घटनेच्या दिवशी आणि त्याआधीही ते एकमेकांच्या संपर्कात आल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असा दावा सरकारी पक्षातर्फे कोर्टात करण्यात आला होता. तर आरोपीतर्फे वकील महेश तवले यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी बाळ बोठे याने तो काम करत असलेल्या वृत्तपत्रात ‘हनी ट्रॅप’संबंधी वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यामध्ये एका भागात यातील आरोपी सागर भिंगारदिवे याच्याबद्दल लिहिले होते. त्याचे उद्योग उघडकीस आल्याने त्या रागातून त्याने या गुन्ह्यात बोठेचे नाव घेतले आहे. याशिवाय दुसरा पुरावा आणि ठोस कारण पोलिसांकडे नाही, असे महेश तवले यांनी सांगितले. यासर्व युक्तिवादानंतर अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयचे न्यायाधीश एम. आर. नातू यांनी हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
सरकारी वकिलांकडून आरोपीच्या वकिलांच्या युक्तीवादाचे खंडण
जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी युक्तिवादात, या हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हनी ट्रॅपचेच कारण आहे का हेही अद्याप पुढे आलेले नाही. केवळ भिंगारदिवे याने नाव घेतले म्हणून बोठेला आरोपी करण्यात आले नाही. पोलिसांना तसे सबळ पुरावे मिळालेले आहेत. भिंगारदिवे आणि बोठे यांच्यात वितुष्ट होते तर ते एकमेकांच्या संपर्कात कसे होते. २४ नोव्हेंबर व घटना घडली त्या ३० नोव्हेंबर या दिवशी या दोघांत मोबाइलवरून वेळोवेळी संभाषण झाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. याशिवाय रेखा जरे यांच्या घराच्या झडतीत त्यांच्याच हस्ताक्षरातील एक पत्र मिळाले असून, त्यात आरोपी बोठेपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे लिहिलेले आहे. या सर्व पुराव्यांची पडताळणी करायची आहे. त्यासाठी आरोपीची अटक आवश्यक असल्याचे पाटील यांनी न्यायालयात सांगितले.