अहमदनगर - जिल्ह्यात आजमितीला एकूण 40 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी तब्बल 14 रुग्ण आमदार रोहित पवार विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या एकट्या जामखेड शहरातील आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्य सरकारकडे बारामतीच्या धर्तीवर जामखेडमध्ये भिलवाडा पॅटर्न राबवण्याची मागणी केली आहे. मात्र तीन दिवसांपूर्वी मागणी करूनही अजून मागणीवर निर्णय झाला नसल्याने शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बारामती तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाने आणि मुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीने लक्ष घालून बारामतीमधील कोरोना आटोक्यात आणला. त्याच प्रमाणे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात ही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावरूनच माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. बारामतीत एक रुग्ण असताना भिलवाडा पॅटर्न राबवला जातो. मग तशा प्रकारचा पॅटर्ण जामखेडमध्येही राबवायला हवा, अशी मागणी शिंदे यांनी केली होती. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.