अहमदनगर - राजकारणातील विजय आणि सत्तेचा महामेरू या गोष्टींना किती महत्व असते याची प्रचिती जसे देवेंद्र फडणवीस घेत आहेत, त्याच पद्धतीने नगर जिल्ह्यात दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत पुत्र सुजय विखे मोठ्या मताधिक्याने खासदार झाले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचे राज्यातील राजकीय वजन वाढले. मुलापाठोपाठ त्यांनीही भाजपमध्ये वाजतगाजत प्रवेश केला आणि नगर जिल्ह्यातील बाराच्या बारा विधानसभेच्या जागा एकहाती जिंकू, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, विधानसभा निकालानंतर आता शिंदे आणि शिवाजी कर्डीले यांची विखेंविरोधातली नाराजी उघड होताना दिसत आहे.
हेही वाचा - 'राहुल गांधींनी केवळ सावरकरांचा नाही तर, स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांचा अपमान केला'
अकोल्यातील पिचड पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशात मोठी भूमिका घेत जिल्हा आता भाजपमय होणार याला पुष्टी दिली. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे पाच आमदार निवडून आले होते. त्यात विखे-पिचडांची भर पडून या जागा सातवर गेल्या होत्या. उर्वरित ठिकाणी पण भाजप-सेनेचे उमेदवार निवडून येतील, असे भाकीत राजकीय विश्लेषकपण व्यक्त करू लागले ते केवळ विखे करिष्मा चालणार या विश्वासावरच.
काँग्रेस-राष्ट्रवादीची पूर्ण वाताहत होणार, संगमनेरमधून थोरातसुद्धा हरणार, कर्जतमधून पवारांना राम शिंदे धक्का देत निवडून येणार, यावर अनेकांचे त्यावेळी एकमत दिसून आले. मात्र, निवडणूक अर्ज दाखल प्रक्रिया, प्रत्यक्ष प्रचार जसा सुरू झाला तसे जिल्ह्यात विखे म्हणतात तसे किमान बारा-शून्य शक्य नसल्याचे समोर आले. त्यानंतर विखे पाटील वरून एक आणि आतून एक राजकारण खेळत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी
संगमनेर-राहत्यात एकमेकांसाठीचे सोयीचे उमेदवार, पारनेरमध्ये विखे समर्थक राहुल झावरे राष्ट्रवादी उमेदवाराच्या पाठीशी, नगरसह कर्जत-जामखेड, राहुरीतील पाठीराख्या समर्थकांची भूमिका वा छुपे आदेश प्रचारा दरम्यान आणि निकालानंतर चर्चेत आले. त्यामुळे विखे पिता-पुत्रांच्या एकूण भूमिकेकडेच भाजप-सेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी संशय व्यक्त केला. राज्य नेतृत्वाकडे याची थेट लेखी तक्रार पण झाली. त्यानंतर ही नाराजी आता उघडपणे माजी मंत्री आणि कर्जतमधून पराभूत झालेल्या राम शिंदेंनी बोलून दाखवली. विखे जिथे जातात तिथे खोड्या करतात, त्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला फायदा होण्याऐवजी नुकसानच झाल्याचे राम शिंदेंनी नाशिकमध्ये माध्यमांसमोर सांगून टाकले.
विखे परिवार सध्या तरी राजकीय दृष्टीने वाळीत पडणार का?
राज्यात सत्ता नाही आणि जिल्ह्यातील भाजप नेत्यांची स्पष्ट नाराजी समोर आलेली असताना विखेंचे राज्यासह जिल्ह्यातील राजकीय वाटचाल बिकट बनली आहे. खास करून जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांची निवड नजीक असताना या दोन्ही संस्थांत नेहमीच वर्चस्व ठेवणारे विखे यांच्या साथीला सध्या ना काँग्रेस-राष्ट्रवादी ना भाजप-सेना, अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पाहता विखे परिवार सध्या तरी राजकीय दृष्टीने वाळीत पडणार का? याची चर्चा सुरू आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेब थोरात आता राज्यात आणि जिल्ह्यात पूर्ण वर्चस्व ठेवून आहेत. आघाडीचे नऊ आमदार, नाराज भाजप नेते, या परिस्थितीचा थोरात पुरेपूर फायदा घेत विखेंना नेस्तनाबूत करण्याची संधी सोडणार नाहीत.
जिल्हा परिषदेत सध्या राधाकृष्ण यांच्या पत्नी शालिनी विखे या अध्यक्षा आहेत. मात्र, त्यांना पुन्हा या पदावर निवडून आणण्याचे कसब विखेंना या बदलत्या राजकीय परिस्थितीत शक्य नसल्याचेच चित्र आहे. राम शिंदे, शिवाजी कर्डीले, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड या पराभूत आमदारांची विखेंवर उघड नाराजी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत पूर्वीचे वर्चस्व किमान या निवडणुकीत त्यांना गाजवता येणार नाही, हे निश्चित. मात्र असे असले तरी, बाळासाहेब विखेंपासून आतापर्यंत जिल्ह्यात नेहमीच स्वतःच्या एका वेगळ्या गटाच्या ताकदीवर राजकीय दबदबा ठेवलेले विखे कुटुंब एवढी सहजासहजी हार न मानता या प्रसंगी काही 'निर्णय' घेत आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवतील, याचीही शक्यता नाकारता येत नाही.