अहमदनगर - दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळवले आहे. देशभरातून केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. तरी अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धी गावामध्ये केजरीवाल समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.
अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारे यांचे सहकारी राहिले आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये सोबत केलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाले होते. त्यातूनच दिल्लीमध्ये केजरीवाल यांचा राजकीय उदय झाला होता. त्यांचा झालेला विजय हा राळेगण सिद्धी परिवारासाठी आनंददायी असल्याचे अण्णा हजारे यांचे माजी स्वीय सहाय्यक दत्ता आवारी यांनी सांगितले.
हेही वाचा - दिल्लीतील विजय हेच वाढदिवसाच मोठं गिफ्ट; केजरीवाल यांच्या पत्नी आणि मुलांची प्रतिक्रिया
राळेगणचे माजी सरपंच जयसिंग मापारी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मंगळवारी मुख्य चौकांमध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त केला. त्यांनी केजरीवाल यांना शुभेच्छाही दिल्या. मात्र, अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या सलग तिसऱ्या विजयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.