अहमदनगर - जामखेड पंचायत समिती सभापतीपदासाठी स्थगित असलेली मतमोजणी प्रक्रिया अखेर पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे यांची सभापतीपदी निवड झाली आहे. भाजपाच्या मनिषा सुरवसे आणि राजश्री मोरे यांना समसमान मते मिळाली. मात्र, यावेळी चिठ्ठी काढल्यानतंर मोरे यांनी बाजी मारली. तब्बल दहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या सभापतीपदी मोरे यांची निवड झाली आहे.
जामखेड पंचायत समिती सभापतीपदासाठी ३ जुलैला निवडणूक झाली होती. पण उच्च न्यायालयाने मतमोजणी करण्यास स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठल्यानंतर काल (दि. १५) पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकराच्या सुमारास बैठक सुरू झाली. यावेळी मतमोजणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपाच्या मनीषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीवर निवड करण्याचे निवडणूक अधिकारी नष्टे यांनी जाहीर केले.
चिठ्ठीत राजश्री मोरे यांचे नाव येताच यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. यावेळी आमदार रोहित पवार यांनीही पंचायत समितीमध्ये येऊन नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांचा सत्कार केला.