अहमदनगर (संगमनेर) - परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. याबाबात सध्या चौकशी सुरू आहे. यामध्ये अनेक अधिकारी ईडी आणि सीबीआयच्या रडारवर असून, याच संबंधित मुंबई पोलीस दलातील उपायुक्त पदावर असलेले राजू भुजबळ यांचेही नाव परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर समोर आले होते. यातील एक पथक काल संगमनेर तालुक्यात येऊन गेले. उपायुक्त पदावर असलेले राजू भुजबळ या अधिकाऱ्याच्या शेतातील घरावर छापा टाकण्यात आला आहे. दरम्यान, त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, यामध्ये पथकाच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती मिळाली आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्याही नावाचा उल्लेख आहे.
'भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह मुंबईतच राहतात'
भुजबळ मूळचे संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा या गावचे आहेत. त्यामुळे मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने तेथे जाऊन सुमारे तीन तास चौकशी केली आहे. पोलीस उपायुक्त भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासह मुंबईतच राहतात. मात्र, त्यांची शेतजमीन व अन्य नातेवाईक गावीच आहेत. त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांच्या गावाकडील घर आणि नातेवाईकांची माहिती मिळाल्याने, पथकाने येथे येऊन चौकशी केली. भुजबळ यांच्या येथील नातेवाईकांचे जवाबही नोंदवून घेतले आहेत.
'कुठलीही माहिती प्रसारमाध्यमांना दिली जात नाही'
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी या मुंबईतील सरकारी निवास्थानी सचिन वाझेसह पोलीस उपायुक्त राजू भुजबळही हजर असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे भुजबळ यांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्या मूळ गावाची माहिती मिळाल्यानंतर हे पथक येथे आले. मात्र, मुंबईतच वास्तव्यास असलेल्या भुजबळ यांचा मूळ गावाशी फारसा संपर्क नाही. तरीही ईडीने आपली औपचारिकता पूर्ण केली असावी, असे बोलले जात आहे. या कारवाईसंबंधी अधिकृतपणे पोलीस किंवा इडीकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही. राजू भुजबळ यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करून हे पथक माघारी परतले असून, आज सकाळी याबाबत चर्चा सुरू झाली. राजु भुजबळ यांच्या नातेवाईकांनाकडून या संदर्भात कुठलीही माहिती प्रसारमाध्यमांना दिली जात नाही.